ashish deshmukh | Charansingh Thakur.jpg sarkarnama
विदर्भ

Katol Assembly Constituency : भाऊ यंदा काटोलमधून मला लढू द्या, देशमुख-ठाकुरांची एकमेकांना ‘रिक्वेस्ट’; पण तिकीट कोणाला मिळणार?

Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh : काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख हे आमदार आहेत. मात्र, नाही, नाही म्हणत आशिष देशमुख हे काकांविरोधात लढण्यास इच्छुक आहेत. तर, चरणसिंह ठाकूर यांनीही बाशिंग बांधलं आहे.

Rajesh Charpe

भाजपत प्रवेश घेताना निवडणूक लढणार नाही, असे सांगणारे माजी आमदार आशिष देशमुख आता उघडपणे मला निवडणूक लढू द्या, अशी विनंती करू लागले आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण योजने’च्या कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी मंचावर भाजपचे संभाव्य उमेदवार चरणसिंग ठाकूर उपस्थित होते. त्यांनीही तुम्ही लोकसभा लढा यावेळी मला विधानसभा लढू द्या, अशी विनंती केली. हे बघता देशमुख आणि ठाकूर यांच्यात काटोलच्या उमेदवारीसाठी रस्खीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचा म्हणूण ओळखला जातो. सुमारे पंचेवीस वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. 2014 च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांना सर्वप्रथम पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, आशिष देशमुख भाजपत फारसे रमले नाही. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच आमदराकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देशमुख यांनी विधानसभेची निवडणूक लढली. पराभूत झाल्यानंतर ते परत भाजपत परतले आहेत.

भाजप प्रवेशाच्यावेळी आपण यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. पण, निवडणूक जवळ येताच ते पुन्हा काटोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. आशिष देशमुखांनी ( Ashish Deshmukh ) भाजप सोडल्यानंतर 2019च्या निवडणुकीत भाजपने चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. ते सुमारे अकरा हजार मतांनी अनिल देशमुखांकडून पराभूत झाले होते.

काटोल मतदारसंघातील भारसिंगी गावात झालेल्या ‘लाडक्या बहीण योजने’च्या कार्यक्रमात आशिष देशमुख यांनी चरणसिंग ठाकूर यांना उद्देशून म्हणाले, “भाऊ तुम्ही आमदार झाले पाहिजे अशी माझी मनातून इच्छा आहे. पक्षाने जर मला संधी दिली तर तुम्ही मला आशीर्वाद द्या.”

त्यानंतर चरणसिंह ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटलं, “आशिषभाऊ तुम्हाला निवडून येण्याची संधी आहे.  तुम्ही लोकसभेची तयार करा. तुमच्यात क्षमता आहे. आता माझे वय 65 आहे. नंतर मला कदाचित संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो, यावेळी मला लढू द्या. माझ्या विनंतीचा तुम्ही विचार करा. जो काही निर्णय होईल, त्यावेळी कमळावरच लक्ष ठेवा.”

दरम्यान, हे बघता आता भाजप कोणाला उमेदवारी देते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT