Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत; पटोलेंचा उपमुख्यमंत्री अजितदादांना टोला

जयेश विनायकराव गावंडे

Maharashtra Politics Latest News : सरकारमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारे लोक बसलेली आहेत. यामुळे सरकारमधील अनेक मंत्रीही सुरक्षित नाहीत, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. अकोला येथे जिल्हा परिषदेच्या चोहट्टा बाजार येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये दोन दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. दाऊदचे सोबती सरकारमध्ये बसलेले आहेत. एनआयए आणि एटीएसच्या कारवाईनंतर दहशतवादी कारवायांना मान्यता देणारे हे राज्य सरकार आहे का? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला.

अमरावतीत अजित पवार यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी अडविल्याच्या प्रकारावरही नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. हे खोटे बोलणारे सरकार आहे. यांच्या राज्यात शेतकरी, तरुण, गृहिणी कोणीच सुखी नाही. लोकांमध्ये सध्या अशांतता असल्याने सरकारमधील आमदार, मंत्र्यांना सुरक्षेमध्ये फिरावे लागत आहे. हे जिथे जातील तिथे लोक त्यांना अडवतील, असा टोला नाना पटोले यांनी अजित पवारांना लगावला.

भाजप प्रणित सरकारने शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक न्यायाची भूमिका संपुष्टात आणली. ओबीसी विरुद्ध मराठा अशी मोठी दरी निर्माण केली. 2014 ते 2019 च्या काळात फडणवीस सरकारने मराठ्यांना फसवले. त्यामुळे लोकांना सरकारवर विश्वास राहिला नाही, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीची दारे 'वंचित'साठी बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. पण याबाबत दिल्लीत काय चर्चा झाली हे माहित नाही, असे म्हणत नाना पटोले यांनी 'वंचित'चा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने सुरुवातीपासूनच द्वेषाचे राजकारण केले आहे. सुरुवातीला त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना आपसात लढवले. आता ते ओबीसी आणि मराठा यांच्यासह अनेक समाजांना आपसात लढवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे दूषित झाले आहे. लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी हिंसक घटनांची संख्या वाढत जाईल. मात्र या सर्व पापांची शिक्षा भाजपला नक्कीच भोगावी लागेल, असा आरोप पटोले यांनी केला. भाजप आणि संघाने भारत तोडण्याचे काम केले आहे. तर काँग्रेस आणि राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे सरकार निश्चिती येईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT