Indapur News : छगन भुजबळ यांचा २४ तारखेनंतर हिशेब करण्याची धमकी दिली जात आहे. तुला दाखवतो, अशी भाषा वापरली जात आहे. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, पण आमचा विरोध झुंडशाही आणि दादागिरीला आहे. आमचीही दादागिरीला दादागिरीने उत्तर देण्याची तयारी आहे, असे आव्हान छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले. (Chhagan Bhujbal's scathing reply to Manoj Jarange Patil's criticism)
इंदापूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मनोज जरांगे हे २४ डिसेंबरनंतर बघतो, अशी धमकी सरकारला देत आहेत. माझ्या ५७ वर्षांच्या राजकीय आयुष्यात सरकारला धमकी देणारा पहिलाच पाहिला आहे. भुजबळांनाही बघतो, असे म्हटलं जात आहे. सरकारही गप्प बसतंय. पण, तुम्हाला सांगतो, आपल्याला गप्प बसता येणार नाही. हिम्मत हरला तर मातीमोल व्हाल. पण, भीतीलाच मारलं तर तुम्ही समाजाला एका उंचीवर घेऊन जाल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे पाटील यांनी माझा येवल्याचा येडपाट असा एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा उल्लेख केला. पण मी एकदा नव्हे; तर दोनदा मुंबईचा महापौर आणि आमदार झालो. देशातील सर्व महापौरांचा अध्यक्ष झालो होतो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव आणि मला येवल्याचं येडपाट म्हणतंय, या शब्दांत जरागेंना खडे बोल सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून सर्व नेते गप्प बसले आहेत. मात्र, माझ्या राजकारणावर तुमचा राग असेल, पण त्यासाठी ओबीसींवर राग काढू नका. ओबीसींना मंडल आयोग लागू करण्यासाठी तुम्ही लढला आहात. पण, या आयोगामुळे मिळालेले आरक्षण वाचवण्याची जबाबदारीही तुमची आहे. त्यासाठी तुम्हाला यावे लागेल, असेही आवाहन भुजबळ यांनी मराठा समाजातील नेत्यांना केले.
या राज्यात अशांतता कोण माजवतंय? आमचीही दादागिरीला दादागिरीने उत्तर देण्याची तयारी आहे. त्यानंतर तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकू नका. त्यांना सांगा की नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा. डीजी आणि कमिशनरीपर्यंत माझे सर्वांना आव्हान आहे की, वेळीच ॲक्शन घ्या. नाही तर काही दिवसांनी तुम्ही पोलिस काहीच करू शकणार नाहीत. हे लोक अशांतात माजवतील, त्यावेळी तुम्ही काय करणार, असा सवालही भुजबळ यांनी पोलिस यंत्रणेला केला.
मनोज जरांगे यांनी काही दिव्यांग नेत्यांवर टीका केली. त्यावरूनही भुजबळ यांनी त्यांना सुनावले. ते म्हणाले की, काही लोक शरीराने दिव्यांग झाले आहेत. पण, तू तर अकलेने दिव्यांग झाला आहे, असा टोलाही भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.