Nagpur Winter Session Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session : अध्यक्ष महोदय, सरकारकडून तुमचा वारंवार अवमान होतोय; पटोले असे का म्हणाले?

Patole Attack On Government : यासंदर्भात घटनांवर सरकार गंभीर नाही, असा आमचा आक्षेप आहे. त्याबाबत तुम्ही सरकारला तंबी द्यावी

Vijaykumar Dudhale

Nagpur News : अमरावती जिल्ह्यात सापडलेला शस्त्रसाठा याबाबत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी निर्देश देऊनही सरकारने निवेदन केले नाही. नागपूरमधील स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट होऊन नऊ कामगार मृत्युमुखी पडले आहेत. त्याबाबतही सांगूनही सरकारने निवेदन केले नाही, त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. हे सरकार वारंवार तुमचा अवमान करतंय, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर नार्वेकर यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार सर्व विषयांवरील निवेदन करेल, असे स्पष्ट केले. यावेळी पटोले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 'नोकझोक' झाली. (Assembly Speaker, you are repeatedly insulted by the government: Nana Patole)

विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष नार्वेकर यांनी प्रश्नोत्तरे पुकारली. मात्र, वडेट्टीवार, पटोले आणि देशमुख यांनी नागपूर कारखान्यातील स्फोटाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात ‘आमदार-खासदार’वरून शाब्दिक चकमक झाली.

नाना पटोले म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना पिंपरी-चिंचवड आणि नागपूर जिल्ह्यात दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यात कामगारांचा मृत्यू झाला आहे. या राज्यात केवळ श्रीमंतांनीच जगावं का? कामगार आणि गरिबांनी जगू नये का?, असं धोरण सरकारचं आहे का? सरकारने कारखान्याच्या बाजूने कायदे करून ठेवले आहेत. स्फोटकांच्या कारखान्यांत अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते. लोकांचा जीव गेला, त्याला मदत केली म्हणजे झालं का? मेलेल्या माणसाला पैसे देण्यापेक्षा माणसं जगली पाहिजे, असे सरकारचे धोरण असले पाहिजे. गरिबांनी जगू नये,? असे सरकारचे धोरण असेल तर सरकारने तसं सांगावं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर जिल्ह्यातील कारखान्यात यापूर्वीही दोन वेळा स्फोट झाला आहे. आताची घटना ही तिसरी आहे. हा कारखानदार 11 हजार 200 रुपये पगार देतो. किमान वेतनही दिलं जात नाही. या घटनेत २३ वर्षांच्या युवतीचा मृत्यू झाला आहे. एका विधवेचा मृत्यू झाला आहे. त्या विधवेला दोन लहान मुली आहेत. खरं तर हा या मजुरांचा खून आहे. त्या कारखानदारावर ३०२ चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या घटनेवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींना बोलू दिलं पाहिजे, असे आमदार नितीन राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले. माजी आमदार अनिल देशमुख म्हणाले की, कारखान्याच्या स्फोटात नऊ कामगार मृत्युमुखी पडले आहेत. सरकारने पाच लाख, तर कारखान्याने 20 लाख रुपये मृताच्या वारसदारांना जाहीर केले आहेत. ते अपुरे असून, त्यांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी.

नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. याची नोंद घेत सरकारने यासंदर्भातील निवेदन करावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यानंतरही सत्ताधारी बाकाकडून निवेदन झालं नाही. त्यामुळे पटोले यांनी मागील आठवड्यात मी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही सरकारला निवेदन द्यायला सांगितले होते. मात्र, सरकारने अजून निवेदन केलेले नाही. सरकारकडून तुमचा वारंवार अवमान होतो आहे. तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही. सरकार तुमचे ऐकायला तयार नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले यांनी अवमानाचा मुद्दा उपस्थित करताच नार्वेकर यांनी जे निवेदन करण्यासंदर्भात सूचना आणि निर्देश दिले आहेत. ते सर्व निवेदन अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार करणार, असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले आमदार, खासदार होते, ज्येष्ठ सदस्य आहेत, असे सांगितले. अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार निवेदन करत असते. तातडीच्या विषयावर सरकारकडून निवेदन केले जाते. आपण जे काही निर्देश द्याल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

पटोले खासदार, आमदार होते आणि ज्येष्ठ नेते आहेत हे पवारांचे शब्द त्यांना लागले. त्यांनी पुन्हा सरकारला उत्तर दिले. ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात शस्त्रसाठा सापडला, ही गोष्ट मी विधानसभेत मांडली. तुम्ही संध्याकाळपर्यंत निवेदन करण्यास सांगितले होते. अमरावती नागपूरपासून जवळच आहे. अधिवेशन सुरू असताना विदर्भात शस्त्रसाठा सापडतो, ही गंभीर बाब नाही का. त्यावर सरकारने अजूनही निवेदन केलेले नाही. अध्यक्ष महोदय, तुमचा अवमान होतो आहे, त्याची आम्हाला काळजी आहे. हे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे. मी आमदार आहे, खासदार होतो, आता पुन्हा आमदार आहे. यासंदर्भात घटनांवर सरकार गंभीर नाही, असा आमचा आक्षेप आहे. त्याबाबत तुम्ही सरकारला तंबी द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT