Bhadravati Police investigate a farmer suicide case after registering offences against two revenue officials under the Atrocity Act and BNS following allegations of caste-based abuse. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur: महसूल अधिकाऱ्याच्या जाचामुळे शेतकऱ्यांनं संपवलं जीवन; पोलिसांची क्लास वन अधिकाऱ्यावर कारवाई

Bhadravati Case, Atrocity Case, Farmer Suicide: भद्रावतीतील शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांविरुद्ध ॲट्रॉसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bhadravati Farmer Suicide: शेतजमिनीच्या फेरफाराच्या कामासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या एका शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून लावल्याच्या आणि त्यानंतर झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणी भद्रावती पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मृत शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भद्रावतीचे तत्कालीन तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

तक्रारीनुसार, मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या मौजा कुरोडा येथील सर्वे क्रमांक ८६ व ८७ या शेतीचा फेरफार करण्याबाबत कोणताही अधिकृत स्थगिती आदेश नव्हता. याच फेरफाराच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी परमेश्वर मेश्राम हे २६ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती तहसील कार्यालयात गेले होते.

या भेटीदरम्यान, तत्कालीन तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी मेश्राम यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयाबाहेर ढकलून दिले, असा गंभीर आरोप वंदना मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे तीव्र मानसिक धक्का बसल्याने परमेश्वर मेश्राम यांनी हताश होऊन तहसील कार्यालयाच्या परिसरातच विषारी औषध प्राशन केले.

विष प्राशन केल्यानंतर परमेश्वर मेश्राम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या जाचक आणि अपमानास्पद वागणुकीमुळेच आपल्या पतीला जीव गमवावा लागला आणि तेच या मृत्यूस सर्वस्वी कारणीभूत आहेत, असा आरोप वंदना मेश्राम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

या गंभीर तक्रारीची दखल घेत भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६६९/२०२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(आर), ३(१)(एस) व ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, भद्रावती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT