Lok Sabha Election 2024 : नशिबाने साथ दिली की राजकारणात कशी उंची गाठता येथे याचे उदाहरण म्हणून भंडाऱ्यातील भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्याकडे पाहता येईल. राजकारणातील डावपेच बाजूला सारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल जिल्हा संयोजक, विश्व हिंदू परिषद जिल्हा संयोजक, भाजप प्रदेश कार्यकारिणीतून नागराध्यक्ष अन् थेट खासदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना पर्याय शोधण्याचे काम सुरू झाले. उच्चशिक्षित आणि नव्या चेहऱ्याच्या शोधात असलेल्या भाजपची नजर तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यावर पडली. संघाकडून ‘ओके’चा सिग्नल मिळाल्यानंतर सिव्हिल इंजिनीअर असलेल्या सुनील मेढे यांना खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 1 लाख 97 हजार 500 अशा विक्रमी मताधिक्क्याने सुनील मेंढे विजयी झाले.
2024 च्या निवडणुकीसाठीही ते इच्छुक आहेत. महायुतीमध्ये ही जागा भाजपलाच सुटणार आणि पुन्हा उमेदवारी मिळणार, अशा विश्वास बाळगून सुनील मेंढे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष पटोले लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे, असे झाले तर यंदाची भंडारा-गोंदिया लोकसभा लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
सुनील बाबूराव मेंढे
14 एप्रिल 1968
सिव्हिल इंजिनीअरिंग पदिवका
सुनील मेंढे यांचा जन्म मुरमाडी तुपकर (ता.साकोली,जि.भंडारा) येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाबूराव डॉक्टर, तर आई प्रतिभा या आरोग्यसेविका. सुनील मेंढे यांचा विवाह 1998 मध्ये शुभांगी यांच्याशी झाला. त्या एमएससी (फिजिक्स), एमबीएस आहेत. पेशाने इंटेरियर डिझायनर आहेत. आता त्या स्प्रिंगडेल शाळेच्या संचालिक आहेत.
मेंढे यांना 2 भाऊ व 4 बहिणी आहेत. एक भाऊ सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक आहेत. दुसरे भाऊ अनिल मेंढे सहकार क्षेत्रात कार्यरत असून व्यावसायिक आहेत. चार बहिणी मालती ब्राह्मणकर (गृहिणी ), अलका पंधरे (गृहिणी), वर्षां खोटेले (पर्यवेक्षिका, महिला बालकल्याण विभाग), मेघा शिकवनकर या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. एक मुलगा सिद्धार्थ हा मुंबईत एमबीए करत आहे. मुलगी सौम्या नागपुरात अकरावीत शिक्षण घेत आहे.
सुनील मेंढे हे पेशाने सिव्हिल इंजिनीअर असल्यामुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 1988 ते 1990 पर्यंत सुपरवायझर म्हणून माजी भाजप आमदार कै.रामभाऊ आस्वले यांच्याकडे काम केले. 1991 ते 1994 पर्यंत खासगीत मॅप काढणे, कंत्राटी बांधकाम केले. 1991 मध्ये त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करणारी सनी कॉन्स्ट्रशन कंपनी सुरू केली. 2016 मध्ये ही कंपनी पत्नी शुभांगी मेंढे यांच्या ताब्यात देऊन ते राजकारणात सक्रिय झाले.
भंडारा-गोंदिया
भारतीय जनता पक्ष
सुनील मेंढे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 1987 मध्ये भंडारा शहरातील संघाच्या खांब तलाव शाखेचे ते मुख्य शिक्षक होते. वडील बाबूराव मेंढे यांच्याकडून त्यांना संघाचा वारसा मिळाला. 1989 मध्ये ते बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बनले. बाबरी प्रकरण पुढे आल्यावर कारसेवक म्हणून सुनील मेंढे 1990 मध्ये सहभागी झाले. त्यांना 10 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्यासोबत तुरुंगात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण होते. 1992 मध्ये त्यांनी पुन्हा कारसेवा केली. ते अयोध्येत गेले होते.
ढाचा पडल्यानंतर राम मंदिराच्या तात्पुरत्या बांधकामात त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडे विश्व् हिंदू परिषदेच्या भंडारा जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी होती. 2014 मध्ये संघाचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी दायित्व पार पडले. फेब्रुवारी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम सांभाळले. 2016 मध्ये पक्षाने त्यांना भंडारा नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. 22 हजार मते घेत सुनील मेढे निवडून आलेत. 2019 मध्ये त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. 1 लाख 97 हजार 500 मतांनी ते विजयी झालेत. त्यांना 6 लाखांवर मते मिळाली.
सुनील मेंढे यांच्या स्वभावात सेवाभावी वृत्ती बालपणापासूनच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालवण्यात येणारे वनवासी आश्रम, श्रमदान कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. कोविड काळात त्यांनी गरजूंना मदत केली. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचा पुरवठा केला. नि:शुक्ल कोविड रुग्णालय सुरू केले. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. स्थलांतरित मजुरांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली. त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली. आजही त्यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबिर घेतले जाते.
सुनील मेंढे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे हे 1 लाख 97 हजार 500 इतक्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यांना सहा लाखांवर मते मिळाली. त्यांच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला दिले जाते. मोदी लाटेतून निवडून आलेले खासदार म्हणून सुनील मेंढे यांच्याकडे पाहिले जाते.
असे असले तरी खासदार मेंढे यांचा विजयासाठी ‘कास्ट फॅक्टर’ही महत्त्वाचा मानला जातो आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कुणबी समाज, त्यातही झाडे-कुणबी मतदार अधिक आहेत. स्वतः सुनील मेंढे झाडे-कुणबी असल्याने याचा फायदा त्यांना झाला. उमेदवारी देताना पक्षाने हे समीकरण लक्षात घेतले होते.
सुनील मेंढे हे 29 वर्षांपासून स्वयंसेवक संघ आणि संघाच्या इतर संस्थांसोबत कार्यरत आहेत. 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. संघ स्वयंसेवक, बजरंगदल भाजपमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. नागराध्यक्ष पदावर काम केल्यामुळेही त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांच्या त्या नेहमीच संपर्कात असतात.
खासदार झाल्यापासून त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील संपर्काचे जाळे मजबूत केले आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना, बॅंकिग क्षेत्रातील बैठका, परिषदा, शिबिरे, सार्वजनिक उपक्रम आदी माध्यमांतून मेंढे यांचा मतदारसंघात चांगला वावर आहे. पक्ष व संघटनात्मक कार्यक्रमांतील त्यांचा वाढता सहभाग, यामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारले आहे.
सुनील मेंढे हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांचे फेसबुक, ट्विटर (एक्स), इन्स्टाग्रामवर खाते आहे. यावर आपल्या कामकाज, भेटी, कार्यक्रमासंबंधी माहिती, व्हिडिओ, महापुरुषांच्या जयंती, दिनविशेष या संदर्भात आवर्जून पोस्ट करत असतात. छायाचित्र आणि व्हिडीओ त्यावरून नियमित पोस्ट होतात.
सुनील मेंढे यांच्या संदर्भात आतापर्यंत कुठलाही मोठा राजकीय वाद निर्माण झालेला नाही. नाना पटोले भाजप सोडून गेल्यावर त्यांना पर्याय म्हणून केंद्रीय नेतृत्वाने मेंढे यांना पुढे आणले. त्यावेळी त्यांना कोणताही विरोध झाला नाही. त्यांच्या मनमिळावू स्वभाव व पक्षाने दिलेली कामगिरी पूर्ण करण्याची जिद्द यामुळे ते लोकप्रिय आहेत.
माजी आमदार कै.रामभाऊ आस्वाले.
सुनील मेंढे हे उच्चशिक्षित आहेत. याशिवाय नितीन गडकरी यांच्या मर्जीतील देखील आहेत. दिल्लीतही मेंढे यांचे वजन आहे. त्याचाचा फायदा घेत ते केंद्रातील अनेक जनहिताच्या योजना मतदारसंघात राबवतात. गोंदियातील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात त्यांनी यश मिळविले. राईस कॉरिडॉर आदी प्रकल्पही त्यांनी आणले.
पर्यटनाला चालना दिली. मेंढे स्वतः आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. प्रादेशिक कीर्तनकारांना त्यांनी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. वादापासून ते कायम दूर असतात. त्यांना पक्षांतर्गत विरोधही नाही. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. निवडणूक लढण्यासाठीच्या निकषात आर्थिक बाजू महत्वाची ठरते. या कसोटीवरही मेंढे सक्षम ठरतात. मतदारसंघातील बहुतांश मतदार झाडे-कुणबी आहेत. मेंढे हे स्वतः झाडे-कुणबी आहेत.
भंडारा-गोंदिया हे दोन जिल्हे मिळून लोकसभा मतदारसंघ आहेत. मेंढे यांनी जी कामे केली, त्या तुलनेत प्रसिद्धी झालेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीतील कामे गल्लीपर्यंत व प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचायला हवी, तशी पोहोचलेली नाहीत. या मतदारसंघात काहींचे ‘लॉबिंग’ सुरू आहे. त्यामुळे अलीकडे मेंढे यांची डोकेदुखी वाढत आहे. जिल्ह्यातील गटबाजीला शांत करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा सुरुवातीपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. एकत्रित निवडणूक लढल्यामुळे या मतदारसंघातून भाजपला आपला गड निर्माण करता आला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली होती. आता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे.
त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघावर दावा करू शकते. ही बाब मेंढे यांच्यासाठी घातक ठरेल. भाजपने या मतदारसंघात स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. सुनील मेंढे यांना वर्षभरापूर्वीच तयारीला लागा, असे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत असल्याने भाजप या मतदारसंघात विजय मिळवू शकते. मेंढे यांची उमेदवारी वगळल्यास भाजपमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते.
(Edited By Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.