Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे बडे नेते उतरणार विधानसभेच्या मैदानात

Assembly Election 2024 : भाजपच्या वतीने उमेदवारांचाही सर्वे करण्यात आला आहे. त्यामध्ये कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे लढल्यास भाजपला जागा राखता येईल; अन्यथा काही खरे नाही, असे सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे बावनकुळे यांना कामठीतून लढण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 17 October : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून महायुतीत मोठा भाऊ या नात्याने सर्वाधिक जागा भाजप लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विदर्भात सुमारे 48 ते 50 जागा निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

त्याकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने भाजपने सर्वच मोठ्या नेत्यांना निवडणूक लढण्याचे निर्देश दिले असल्याची खात्रीलायक माहिती आहे, त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक लढवणार की नाही, हा संभ्रम दूर झाला आहे. ते आपल्या परंपरागत कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. मागील दोन महिन्यांपासून ते विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत, असे बोलले जात होते. बावनकुळे हेसुद्धा यावर मौन बाळगून होते. आता मात्र ते निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षानेच त्यांना निवडणूक लढविण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून (Kamathi Assembly Constituency) यापूर्वी ते तीन वेळा निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ते राज्याचे ऊर्जामंत्री होते. मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्या वेळी ते नाराजही झाले हेाते. मात्र, त्यांनी ती उघडपणे दाखवली नव्हती. सध्या कामठीमध्ये टेकचंद सावरकर हे आमदार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला नागपूर ग्रामीणमध्ये मोठा फटका बसला होता. कामठीसह सर्वच विधानसभा मतदारसंघातून भाजपची पीछेहाट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड रोखण्यासाठी विधानसभेच्या रणांगणात सर्वच मोठ्या नेत्यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूरमध्ये पक्षाचे केंद्रातील आणि मध्य प्रदेशातील मंत्री कैलास विजयवर्गीय यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते सुमारे दोन महिन्यांपासून नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. बारीकसारीक माहिती ते गोळा करीत आहेत. कोण नाराज, कोण दुखावले याची माहिती घेत आहेत.

भाजपच्या वतीने उमेदवारांचाही सर्वे करण्यात आला आहे. त्यामध्ये कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे लढल्यास भाजपला जागा राखता येईल; अन्यथा काही खरे नाही, असे सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे बावनकुळे यांना कामठीतून लढण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे.

नवरात्रोत्सवात बावनकुळे यांनी संपूर्ण कामठी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदारससंघातील सर्व दुर्गा उत्सव मंडळांना भेटी दिल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेऊन त्यांनी संवादही साधला आहे. विरोधकांच्या तयारीचाही त्यांनी अंदाज घेतला आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केल्याची सांगण्यात येत आहे. भाजततर्फे उमेदवारांची नावे जाहीर होताच, ते उघडपणे समोर येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT