Shishupal Patle-Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Shishupal Patle : विदर्भात भाजपला पुन्हा धक्का; माजी खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Vijaykumar Dudhale

Mumbai, 16 August : काँग्रेस पक्षाने विदर्भात पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करताना भंडारा जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीतील अनुकूल वातावरण लक्षात घेऊन अनेक नेते महाविकास आघाडीकडे येत असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांनी महिनाभरापूर्वी आपला राजीनामा भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला होता. पटले हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज होते, त्यांनी अखेर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

शिशुपाल पटले यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता. पटले यांनी खासदार, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती आदी पदांवर काम केले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पोवार समाजाचा मोठा नेता पक्ष सोडून गेल्याने विदर्भात भाजपला धक्का मानला जात आहे.

मी अनेक वर्षे भाजपचे काम केले आहे. पूर्वीचा भाजप आणि आताचा भाजपमध्ये खूप फरक आहे. सत्तेचा धाक दाखवून ईडीच्या कारवाया करून पक्ष फोडण्याचे प्रकार आम्हाला योग्य वाटले नाहीत. विकास कामे बंद करून व्होट बॅंकेच्या योजना आणणे, हे योग्य नाही, त्यामुळेच मी भाजपचा महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता, असे काँग्रेस प्रवेशानंतर माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्याचा इतिहास असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विश्वास ठेवून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही माजी खासदार पटले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपचे अनेक आमदार काँग्रेसच्या मार्गावर आहे. पटले यांचा प्रवेश ही सुरुवात आहे. महाराष्ट्राला भंगार करण्याचे काम भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने केले आहे. काँग्रेसच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित राहिल, असा राज्यातील जनतेच्या मनात आहे.

भाजप महाराष्ट्रद्रोही आणि गुजरातधार्जिणे आहे, हे पटले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेत्यांना संदेश दिला आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT