Accident at Buldhana Sarkarnama
विदर्भ

Buldana Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर वाहन पेटल्यास मृत्यू अटळ, ‘हे’ आहे कारण...

Accident : जीव वाचविण्याबाबत सुविधा नसल्याचे आजच्या अपघातानंतर दिसून आले.

सरकारनामा ब्यूरो

Passengers have no choice but to die if the vehicle catches fire : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतरही या मार्गावर प्रवाशांचे जीव वाचविण्याबाबत सुविधा नसल्याचे आजच्या अपघातानंतर दिसून आले. नागपूरपासून २०० किलोमीटरच्या अंतरात एकही अग्निशमन केंद्र नसल्याची बाब पुढे आली आहे. (There is no fire station up to 200 km)

वाहनाने पेट घेतल्यास प्रवाशांना मृत्यूशिवाय पर्यायच नाही, हे भयाण आहे, पण वास्तव आहे. समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला २०२२ला लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंधरा दिवसांत अर्थात २८ डिसेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास पहिला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला होता.

एकूण पहिल्या महिनाभरात चार गंभीर अपघात झाले असून यात १६ जण जखमी झाले. पाच किरकोळ अपघातात २० जण जखमी झाले. त्यानंतर या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात राजकीय धुरळाही उडाला. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी केली.

राज्य सरकारने उपाययोजनांसाठी पावले उचलली. परिवहन, रस्ते, सुरक्षा विभाग व पोलिसांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली. परंतु यात टायर तपासणीसोबत नागपूर-शिर्डीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे आठ ठिकाणी चालकांसाठी समुपदेशन केंद्र उभारणे यावर चर्चा झाली.

आज या मार्गावर मदत केंद्रे नाहीत, अग्निशमन केंद्रही नाही. आज (ता. १ जुलै) पहाटे दीड वाजताच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात बस जळल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ठरावीक अंतरावर अग्निशमन केंद्राचा मुद्दा पुढे आला.

नागपूरपासून दोनशे किलोमीटर अंतरात एकही अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे या अंतरात एखादे वाहन जळल्यास आग विझविण्यासाठी एक ते दीड तास प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत प्रवाशांचा जीव जाण्याचीच शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने उपाययोजनांबाबत पुढाकार घेतला असला तरी अग्निशमन व मदत केंद्राचे गांभीर्य कुठेही दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

बुलढाणा जिल्ह्याने अनुभवले ‘समृद्धी’चे जीवघेणे रूप..

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात १५ अपघात झाले. यात तीन गंभीर तर नऊ किरकोळ अपघाताचा समावेश आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे अतिवेगाने वाहने चालविल्याप्रकरणी ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. केवळ महिनाभरात बुलढाणा जिल्ह्याने समृद्धीचे जीवघेणे रूप अनुभवले.

प्रवासी व ट्रॅव्हल्सकरिता महामार्गावर सुविधांचा अभाव..

शौचालय, प्रसाधनगृहांची सुविधा नाही. जेवणासाठी ढाबा, हॉटेल्स नाहीत. पेट्रोल पंपाची संख्या अतिशय कमी आहे. बॅरीकेट्सला लावण्यात आलेल्या कुलुपामुळे यू टर्नसाठी ६०-६० किलोमीटर अंतर कापावे लागते. परिणामी प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास यू टर्न घेण्यास प्रचंड त्रास होतो आणि वेळ वाया जातो.

नागपूरपासून (Nagpur) दोनशे किलोमीटर अंतरात कुठेही अग्निशमन केंद्र नाही. मदत केंद्रही नाही. त्यामुळे अपघात (Accident) झाल्यास प्रवाशांवर वेळेत उपचार होणे अशक्य आहे. त्यामुळे नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने (State Government) या मार्गावर ठरावीक अंतरावर अग्निशमन व मदत केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे नागपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा डवरे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT