Chandrapur District APMC
Chandrapur District APMC Sarkarnama
विदर्भ

Chandrapur APMC Analysis : चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसची कामगिरी चांगली, पण कुठे-कुठे सभापतिपदासाठी रस्सीखेच !

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur District's APMC Analysis News : चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राजकीय वैऱ्यांनी हातमिळवणी केली. पक्षनिष्ठा पायदळी तुडविल्या गेल्या. आता बाजार समितींच्या सभापतीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यातील काही बाजार समितीमध्ये काठावर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सदस्यांनी पळवापळवी टाळण्यासाठी या सदस्यांना पर्यटनाला पाठविण्यात आले आहे.

सभापती नाही तर योग्य 'मुल्य' तरी द्या, यासाठी अनेक ठिकाणी नवनिर्वाचित संचालक अडून बसल्याची माहिती आहे. येत्या १२ आणि १३ तारखेला प्रत्येकी सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक होईल. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अठरा सदस्यीय कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुमतासाठी दहा सदस्यांची आवश्यकता आहे. चंद्रपूर, कोरपना, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल १२ मे तर राजुरा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, भद्रावती आणि पोंभूर्णा या बाजार समितीची निवडणूक १३ मे रोजी होईल.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेस आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी हातमिळवणी केली. त्यांच्या आघाडीला दहा जागांवर विजय मिळाला. गंगाधर वैद्य सभापती होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र उपसभापतिपदावर एकमत न झाल्याने दगाफटका होऊ नये, यासाठी सदस्यांना पर्यटनाला पाठविण्यात आले आहे. पारस पिंपळकर उपसभापती होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे,.

कोरपना बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असून १८ पैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. गणेश गोडे, अशोक बावणे विनोद नवले किंवा इरफान शेख यांच्यापैकी एकाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप पुरस्कृत आघाडीने १४ जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत पॅनलने चार जागांवर विजय मिळविला आहे. भाजपकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून आवेश पठाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आवेश पठाण आमदार बंटी भांगडिया यांच्या खास मर्जीतील आहे. सोबतच रमेश पाटील बोरकर आणि गणेश तर्वेकर यांनाही सभापती पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा आहे.

मूल बाजार समितीत संतोष रावत गटाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. सभापतिपदासाठी राजेश कन्नमवार यांचे नाव चर्चेत आहे. कोरपना, नागभीड आणि मूल येथील सदस्यांना पर्यटनासाठी बाहेर नेण्याची आवश्यकता तूर्तास पडलेली नाही. गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल ३२ वर्षानंतर भाजपच्या ताब्यात आली आहे. भाजप समर्थीत आघाडीने १२ जागा जिंकत विद्यमान आमदार सुभाष धोटेंना चांगलाच धक्का दिला. धोटे यांच्या गटाला केवळ सहा जागा मिळाल्या. स्वप्निल अनमूलवार हे सभापती होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॉंग्रेस समर्थीत आघाडीला १४ तर भाजप पुरस्कृत पॅनलने चार जागांवर विजय मिळविला. सभापती म्हणून प्रभाकर सेलोकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते यापुर्वीसुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि प्रशासक राहिले आहेत. ते या निवडणुकीत ते अविरोध निवडून आले आहेत. मात्र निवडणुकीनंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. अद्याप सदस्यांना पर्यटनास पाठविलेले नाही.

राजुऱ्यात अॅड. अरुण धोटे सभापती होतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. कॉंग्रेसला नऊ, भाजप पाच आणि शेतकरी संघटनेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. कॉंग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. त्याची जुळवाजुळव करणे सुरू आहे. पोंभूर्णा तालुक्यात खासदार बाळू धानोरकर गटाला बहुमत मिळाले.

कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी मरपल्लीवार सभापती होतील, याबाबत आता कुणाला संशय नाही. चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. सतरा जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. घनश्याम डुकरे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडू शकते, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

वरोरा-भद्रावतीत रस्सीखेच..

कॉंग्रेसचे (Congress) खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या मतदार संघातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र वरोऱ्यात धानोरकर विरोधी गटाला नऊ जागा जिंकता आल्या. धानोरकरांना आठ जागा मिळाल्या. नितीन मत्ते अपक्ष निवडून आले. बहुमतासाठी दहा सदस्यांची गरज आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी सभापतिपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. दरम्यान राजुरकर गटाने आपले सदस्य पर्यटनाला रवाना केल्याची माहिती आहे. यात मत्ते यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

मत्ते यांनी सभापतिपदाची मागणी लावून धरली आहे. १२ मे रोजी सभापतीची निवडणूक होईल. तोपर्यंत येथे बऱ्याच उलथापालथी झालेल्या बघायला मिळतील, अशी चर्चा राजकीय (Political) वर्तुळात आहे. भद्रावतीत रवींद्र शिंदे गटाकडे १२ सदस्य आहेत. धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्याकडे केवळ सहा आहेत. येथेही सभापती बसविण्यासाठी धानोरकरांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे सदस्यांना सांभाळताना बरीच कसरत करावी लागत आहे.

सभापतीची निवडणूक -

१२ मे- चंद्रपूर, कोरपना, चिमूर, ब्रह्मपुरी, वरोरा, मूल

१३ मे- राजुरा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, भद्रावती, पोंभूर्णा

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT