Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे यांनी ठोकला 5 कोटींचा दावा; सुलेखा कुंभारे यांना धाडली नोटीस

Bawankule legal notice News : खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप केल्याने कुंभारे यांना आपल्या वकिलामार्फत पाच कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बावनकुळे यांनी बजावली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री व बहुजन एकता मंचच्या नेत्या ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यातील वाद आता चांगलाच वाढला आहे. बावनकुळे यांनी या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. शनिवारी मात्र त्यांनी सुलेखा कुंभारे यांना कायदेशीर नोटीस बजावली. खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप केल्याने कुंभारे यांना आपल्या वकिलामार्फत पाच कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बावनकुळे यांनी बजावली आहे.

कामठी नगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. कुंभारे यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या कार्यकर्त्यासाठी मागितली होती. भाजपने (BJP) यास नकार दिला. त्या बदल्यात उपाध्यक्षपद आणि नगरसेवकाच्या पाच जागा देऊ केल्या होत्या. मात्र कुंभारे यांनी आपला हट्ट सोडला नाही. त्यावरून भाजप व बहुजन रिपब्लकन एकता मंचमधील वाटाघाटी फिसकटल्या दोन्ही पक्षाने आपआपले उमेदवार उभे केले आहेत.

या दरम्यान मतदानाच्या दिवशी भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा आरोप कुंभारे यांनी केला. त्यांचे नातेवाईक सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाउसवरून पैशाचे वाटप केले जात आहे आणि बोगस मतदान करीत असल्याचा आरोपही त्यांनी केले. हे सर्व बावनकुळे यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा आरोपाचा व्हिडीओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर आरोपप्रत्यारोपांनी सुरुवात झाली.

कुंभारे यांनी बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघात मतचोरी करून निवडून आल्याचाही आरोप पत्रकार परिषद घेऊन केला. भाजपच्यावतीने कुंभारे यांचे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे. सुलेखा कुंभारे यांनी तोंडी आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. संबंधित यंत्रणेने चौकशी करावी असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी कुंभारे यांना केले आहे. मात्र त्यांनी आरोप करणे सातत्याने सुरूच ठेवल्याने बावनकुळे यांनी कुंभारे यांना नोटीस बजावली आहे. यामुळे हा वाद आता चांगलाच चिघळणार असल्याचे दिसून येते.

सुलेखा कुंभारे (Sulekha Kumbhare) यांनी बदनामीकारक, बेजबाबदार विधाने तत्काळ मागे घेऊन त्यांचे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक माध्यमासह समाज माध्यमांवरील प्रसारण थांबवावे. पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी. तसेच सर्व माध्यमात व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुद्धिपत्रक जाहीर करावे अन्यथा मानहानी केल्याने 15 दिवसांत पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई अदा करावी, असेही नोटीसमध्ये बावनकुळे यांनी म्हटले आहे.

कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत श्रीमंत उमेदवारांना पाठिंबा देणे, त्यांच्या सहकाऱ्याला ‘दलाल’ संबोधणे, काळ्या पैशांचे संरक्षण करणे तसेच बोगस मतदानाला प्रोत्साहन देणे असे गंभीर आरोप सार्वजनिकरीत्या केले आहेत. हे सर्व आरोप पूर्णतः खोटे, आधारहीन व दिशाभूल करणारे असून, त्यामुळे बावनकुळे यांची राजकीय, सामाजिक व वैयक्तिक प्रतिमा समाजात मलिन झाल्याचे नोटिशीत म्हटले आहे. नोटीशीतील सर्व मुद्द्यांची पूर्तता न केल्यास कुंभारे यांच्याविरोधात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच या कारवाईत होणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी पूर्णतः त्यांच्यावरच राहील, असे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT