Akola Congress Political News : आधीच गटातटात विभागलेल्या अकोला जिल्हा काँग्रेसमधील वाद काही नवीन नाही. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला अकोला जिल्हा काँग्रेस गेल्या दोन दशकांपासून पिछाडीवर गेला आहे. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हे 'मोहब्बत की दुकान' ही मोहीम देशभर चालवत आहेत. तर दुसरीकडे अकोल्यातील काँग्रेसमधील 'मोहब्बत की दुकान' मध्ये 'नफरत की दुकान' सुरू झाली आहे. (Congress leaders in the district need to do self-reflection)
झालेल्या प्रकाराचे आत्मचिंतन करण्याची गरज जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आहे. कारण काँग्रेसमधील हा वाढता अंतर्गत वाद काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये घातक ठरणार आहे. नाहीतर काँग्रेसच्या या स्थितीचा लाभ विरोधी पक्षांनाच होण्याची शक्यता आहे. गटातटात विभागलेली अकोल्यातील 'मोहब्बत की दुकान' आगामी निवडणुकीत चालणार का, हे पहावे लागणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपूर येथील काँग्रेसच्या वादानंतर अकोल्यातही क्षुल्लक कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रकार घडला. पत्रकार आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला.
आता प्रदेश उपाध्यक्ष यांनी या 'वादाची' चौकशी करीत काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. माहितीचा अहवाल लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या 'त्या' दोन पदाधिकाऱ्यांच्या वादावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधीच गटातटात विभागलेल्या अकोला काँग्रेसमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
नागपूर येथील बैठकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचा प्रकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच घडला होता. त्यानंतर अकोल्यातही याची पुनरावृत्ती होत. प्रदेश पातळीवरील दोन पदाधिकाऱ्यांचा वाद एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत झाला. अकोल्यातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतच फोटो काढण्यासाठी उभे राहण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला.
प्रदेश पदाधिकारी डॉ.अभय पाटील आणि माजी महापौर मदन भरगड यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली. तर या वादामध्ये एकाने बंदुकीने उडविण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष निरीक्षक नाना गावंडे यांना या वादाची चौकशी करण्याची सूचना दिली होती. काल दिवसभर या प्रकरणात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून या वादाची माहिती पक्षनिरीक्षक नाना गावंडे यांनी घेतली.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे २१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात आले. त्यांनी दिवसभर स्वराज्य भवन येथे या वादाबाबत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली व 'त्या' दोन पदाधिकाऱ्यांकडूनही झालेल्या वादाबद्दल माहिती घेतली आहे. पक्ष निरीक्षक नाना गावंडे यांनी घेतलेल्या टिपणीचा अहवाल तयार करून दोन ते तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एकत्रित अहवाल देणार असल्याची माहिती नाना गावंडे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.
१६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसची बैठक पार पडली. तसेच १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. या दोन्ही कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी माहिती घेण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने याची गंभीर दखल घेण्यात येऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष यावर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्ष मोठा असल्याने छोट्या-छोट्या गोष्टी सुरूच राहतात. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावा पक्ष निरीक्षक नाना गावंडे यांनी केला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळणार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. पक्ष निरीक्षक यांच्या या दाव्यामुळे पक्षामध्ये सर्व काही आलबेल दाखविण्याचा केवळ प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र पक्षातील धुसफुस अनेकदा उफाळून आली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.