Sanjay Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Sanjay Deshmukh: ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले खासदार संजय देशमुख फायद्यात : सत्ताकारणात पहिल्यांदा होणार शिवसेनेचा अध्यक्ष

Yavatmal DCC Bank Election: महायुतीच्या बैठकीत मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. खासदार संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि भाजपला उपाध्यक्षपदे मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

DCC Bank Election News: यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीची सत्ता आल्यानंतर अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीला अखेर दिशा मिळाली आहे. बँकेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा मान्य झाला असून खासदार संजय देशमुख यांचे नाव निश्चित मानले जाते. दुसरीकडे, दोन उपाध्यक्षपदांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरे भाजपच्या वाट्याला जाणार आहे. बँकेच्या सत्ताकारणात पहिल्यांदाच शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे.

महायुतीच्या नेत्यांची रविवारी (ता. १) धामणगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत बँकेचे अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि विभागीय समितीच्या अध्यक्षपदांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अध्यक्षपदासाठी तिन्ही पक्षांकडून दावे केले जात असताना अखेर संख्याबळ आणि राजकीय समीकरणांचा विचार करून अध्यक्षपद शिवसेनेकडे ठेवण्याच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या वाट्याला अध्यक्षपद गेल्याने बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार आहे. खासदार संजय देशमुख यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असून, त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, अधिकृत घोषणा आणि निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होणार नाही.

दोन उपाध्यक्षपदांच्या वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्ष क्रमांक १ तर भाजपला उपाध्यक्ष क्रमांक दोन असे समीकरण राहणार आहे. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय जाधव यांचे नाव निश्चित मानले जाते. प्रवीण देशमुख आणि नाना गाडबैले यांच्याही नावांची चर्चा आहे. भाजपकडून नितीन भूतडा यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीत पदवाटपावर मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीदरम्यान राज्यस्तरीय नेत्यांनीही हस्तक्षेप केला.

सकाळी नऊ वाजता संचालकांची बैठक

रविवारी (ता. १) युतीच्या नेत्यांची बैठक झाली. यात पदवाटपाचा फॉर्म्युला ठरला. यानंतर सोमवारी (ता. २) संचालकांची बैठक बोलविण्यात आली आहे. यात अध्यक्ष तसेच दोन उपाध्यक्षांची नावे जाहीर केली जाणार आहे.

काँग्रेस भरणार फॉर्म

महाविकास आघाडीची रविवारी (ता. १) बैठक झाली. बैठकीत महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे ठरविण्यात आले. दुसरीकडून महायुतीकडून निवड बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT