Anil deshmukh Sarkarnama
विदर्भ

Cricket World Cup News : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विदर्भावर अन्याय, अनिल देशमुख लिहिणार बीसीसीआयला पत्र !

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha Cricket Association International Stadium: आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपुरात खेळवला जाणार नाही. नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. याठिकाणी विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथून प्रेक्षक सामना बघण्यासाठी येतात. (Five matches were played in the stadium in Pune)

एकीकडे विश्व चषक सामन्यात पुण्यातील स्टेडियममध्ये पाच सामने खेळवले जात असताना विदर्भातील स्टेडियममध्ये एकही सामना नाही. हा एक प्रकारे विदर्भावर अन्याय आहे, त्यामुळं विदर्भात विश्व चषक स्पर्धेतील एकतरी सामना खेळवला जावा, यासाठी बीसीसीआयला पत्र लिहिणार असल्याचे, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी सांगितले. आज (ता. २८) सकाळी देशमुख (Anil Deshmukh) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

भारतात यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना स्थळांमधून नागपूरला वगळल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे नागपूरकर प्रेक्षक पहिल्यांदाच वर्ल्डकपचा सामना घरच्या मैदानावर पाहू शकणार नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम काल (ता. २८) जाहीर केला. यानुसार स्पर्धेतील सामने अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, धर्मशाळा आणि लखनौ या १० शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. मात्र या शहरांमध्ये मध्य भारतातील एक लोकप्रिय व प्रमुख स्थळ आणि देशाचा झिरो माईल असलेल्या नागपूरचा कुठेही उल्लेख नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एरवी, वर्ल्डकपचा सामना म्हटला की, नागपुरात किमान एक तरी सामना खेळला जातो. दुर्दैवाने यावेळी विदर्भ क्रिकेट असोसिएशनला यजमानपद भूषविण्याची संधी मिळणार नाही. परिणामतः नागपूरकर क्रिकेटरसिकांना क्रिकेटचा थरार ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळणार नाही. उल्लेखनीय म्‍हणजे, २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत व्हीसीएला चार सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळाली होती.

फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली कसोटी तीन दिवसांच्या आत संपल्याने व्हीसीए जामठाची खेळपट्टी आयसीसीच्या नियम ३८.ब (३,अ) नुसार ‘डेंजर' म्हणून गणल्या गेली. त्याच्याच फटका बसला असावा, असा कयास लावण्यात येत आहे.

नाराजी अजिबात नाही : दस्तूर

यासंदर्भात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सीईओ फारुख दस्तूर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ही आयसीसीची स्पर्धा असून, तेच स्थळांसंदर्भात निर्णय घेत असतात. त्यांना तो अधिकारही आहे. यात आमचा कोणताही रोल नाही. भारतात क्रिकेटची खूप मैदाने आहेत.

सर्वांनाच सामने आवंटीत करावे लागतात. तरीही आम्हाला सहा महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा टी-२० आणि कसोटी सामन्यांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला जे सामने देतील, ते आयोजित करू. त्यामुळे वर्ल्डकपचा सामना मिळाला नाही म्हणून नाराजी अजिबात नाही.

नागपूरकर संधीला मुकणार : फडकर

विदर्भाचे (Vidarbha) माजी कर्णधार व व्हीसीएच्या निवड समितीचे अध्यक्ष सुहास फडकर म्हणाले, नागपूरला वर्ल्डकपचा सामना का मिळाला नाही, याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. हे सगळे बीसीसीआयच्या हातात असते. पण व्यक्तिशः मी नाराज अवश्य आहे. माझ्या मते, नागपूर हे सेंटर जगातल्या सर्वोत्तमपैकी एक आहे.

येथील सोयीसुविधा चांगल्या आहेत, मैदानावर प्रेक्षकांची भरपूर गर्दी असते. शिवाय सामनेही रोमांचक होत असतात. इतकं सारं व महत्त्वाचं सेंटर असूनही सामना मिळाला नाही, याचं निश्चितच दुःख आहे. त्यामुळे नागपूरकर निश्चितच एका चांगल्या संधीपासून वंचित राहणार आहेत.

क्रिकेटप्रेमींसाठी दुर्दैवी बाब : बाकरे

क्रिकेट प्रशिक्षक माधव बाकरे यांनीही वर्ल्डकपमधून नागपूरला (Nagpur) वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयचा असतो. कोणाला सामना द्यायचा ही त्यांची मर्जी असते. मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेचा एकही सामना नागपूरला मिळू नये, याबद्दल आश्चर्य वाटले. क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने ही दुर्दैवी बाब आहे. नागपूरला सामना का मिळाला नाही, हे मला माहिती नाही. मात्र याचे दुःख माझ्यासह सर्वांनाच राहणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT