Cricketnama 2023 Nagpur Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : ठाकरेंचे वाघ, मनसेची शिकार करणार का? अंबादास दानवेंचा कस लागणार..

Jagdish Pansare

Nagur News:पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : विधीमंडळ अधिवेशनाच्या गरमागरमीत क्रिकेटनामा या राजकीय स्पर्धेने नागपूरच्या वातावरणात रंगत आणली आहे. सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा तर्फे घेण्यात येणाऱ्या `क्रिकेटनामा`च्या विदर्भातील पहिल्या करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाघ (शिवसेना टायगर्स) शिकारीसाठी सज्ज झाले आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे टायगर्स आज (सोमवारी) होणाऱ्या साखळी सामन्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसे चॅलेंजर्सची शिकार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या निमित्ताने राजकारणात विरोधकांना आपल्या सडेतोड आणि आक्रमक भूमिकेमुळे जेरीस आणणाऱ्या अंबादास दानवे यांचाही कस लागणार आहे.

दानवे यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे बारीक लक्ष असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या होमपीचवर ठाकरेंचे वाघ क्रिकेटनामाच्या चषकावर दावा सांगतात का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

अंबादास दानवे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावीत झालेल्या पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांच्यावर राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर विरोधी पक्षनेते म्हणून दिली. गेल्या वर्षभरात त्यांनी ठाकरेंचा विश्वास जिंकला. आता त्याच विश्वासाने अंबादास दानवे यांच्या रणनितीला साजेसा खेळ शिवसेनेचे टायगर्स करणार का?

मनसे चॅलेंजर्सला धूळ चारत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड, मेकोसाबागच्या मैदानावर सायंकळी साडेचार वाजता शिवसेना टायगर्स आणि मनसे चॅलेंजर्स या संघात होणार हा सामना निश्चितच रोमहर्षक होणार आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या भव्य स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाया मंत्री सुधीर मुनगंटीवार स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके हे निमंत्रक आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT