Lady Naxal in Gadchiroli. Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Naxal : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमलाला अटक

Police Action : अनेक गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये होता सक्रिय सहभाग

प्रसन्न जकाते

Gadchiroli Naxal : फेब्रुवारीमध्ये माओवाद्यांकडून साजरा करण्यात येणाऱ्या टीसीओसी सप्ताहादरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. घातपाताच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या जहाल महिला माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, जाळपोळ, देशविघातक कृत्य असे अनेक आरोप या महिला माओवाद्यावर आहेत. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (वय 30, रा. बडा काकलेर, तहसील भोपालपट्टनम, जि. बिजापूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव आहे.

गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने भामरागड पोलिस ठाण्यात राजेश्वरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 30 एप्रिल 2023 रोजी केडमारा येथील जंगलात झालेल्या चकमकीमध्ये राजेश्वरीचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात असलेल्या तोयनार पोलिस स्टेशनमधील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये राजेश्वरीचा प्रत्यक्ष सहभाग होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा ही 2006 मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये सदस्य पदावर भरती झाली. तेव्हापासून ती माओवादी चळवळीत सक्रिय झाली. 2010-11 मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये राजेश्वरी उपकमांडर झाली. 2016 मध्ये फरसेगड दलममध्ये तिला पाठविण्यात आले. 2019 पर्यंत ती दलमची सदस्य होती. 2019 मध्ये तोयनार पोलिस स्टेशनच्या जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती. 2020 मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर राजेश्वरी ‘टेलर टीम दंडकारण्य’ स्पेशल झोनल कमिटीअंतर्गत ती एसीएम (एरिया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत झाली.

माओवादी चळवळीत असताना चार चकमकींमध्ये राजेश्वरीचा प्रत्यक्ष सहभाग होता. 2016 मध्ये छत्तीसगडच्या फरसेगडमध्ये असलेल्या मौजा कर्रेमर्का जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या भीषण चकमकीमध्येदेखील तिचा सहभाग होता. 2016 मध्ये छत्तीसगडच्या भोपालपट्टनममध्ये असलेल्या मौजा मरेवाडा जंगल परिसरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात राजेश्वरीचा सहभाग होता. 2018 मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील मौजा कचलाराम जंगलातही पोलिसांसोबत माओवाद्यांची चकमक झाली होती. 2023 मध्ये गडचिरोलीतील भामरागडच्या मौजा केडमारा जंगलातील चकमकीमध्येही राजेश्वरीने जवानांवर भीषण गोळीबार केला होता.

महाराष्ट्र सरकारने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटाच्या अटकेसाठी सहा लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. आता तिला अटक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे. जानेवारी 2024 पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी एकूण 73 माओवाद्यांना अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाने महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT