Nitin Gadkari-Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Maha Jansampark Abhiyan : लोकसभा निकालाची धास्ती; गडकरी, फडणवीसांसह भाजपचे 32 हजार कार्यकर्ते उतरणार नागपूरच्या मैदानात...

BJP Election Strategy : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा आणि मताधिक्याचा टक्क्याने भाजपने चांगलीच धास्त घेतली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भाजपकडून कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आला आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 05 October : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा आणि मताधिक्याचा टक्क्याने भाजपने चांगलीच धास्त घेतली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भाजपकडून कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आला आहे. रोज भूमिपूजने, उद्‍घाटनाचे कार्यक्रम होत असताना आता उद्या रविवारी (ता. 06 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे तब्बल 32हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.

भाजपने नागपूरमधून महाजनसंपर्क अभियानास सुरवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप आपल्या प्रचाराचा श्री गणेशा करणार आहे.

महाजनसंपर्क अभियानाच्या (Maha Jansampark Abhiyan) माध्यमातून भाजपचे नेते, पदाधिकारी, प्रभारी, प्रवासी कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्ते दहा वर्षांच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाचे प्रगतिपुस्तक घेऊन घरोघरी जाणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्यांना विधानसभेत मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

जनतेच्या समस्या, अडचणींची नोंद घेतली जाणार आहे. तसेच, मतदार याद्यांमधील नावांची प्रत्येकाच्या घरी जाऊन खातरजमा केली जाणार आहे, असे भाजपचे (BJP) नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले.

नागपूर शहरात (Nagpur) २१५८ बूथ आहेत, भाजपचे तेवढेच बुथ प्रमुख आहेत. शहरात ७३४ शक्ती केंद्र आणि प्रमुख आहेत. सुमारे ५३०० पदाधिकारी, सहप्रभारी शक्ती प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य असे एकूण ३२ हजार कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत.

पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बूथवर भेटी देणार आहेत. देवेंद्र फडणवीस आपल्या दक्षिण-पश्चिम, उत्तर नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, यांच्यासह सर्व आजी-माजी आमदार आपापल्या मतदारसंघातील अभियानानात सहभागी होणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने ७५ टक्के मतदानाचा संकल्प केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा नागपुरातून मतदान करण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र ५५ टक्के मतदान झाले होते, त्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चांगलीच धास्ती घेतली असून विधानसभा निवडणुकीत कोणतीही कसर ठेवायची नाही, असे धोरण अवलंबिले आहे.

या दरम्यान मतदार याद्यांमधील घोळ मोठ्या प्रमाणात समोर आला होता. जवळपास पावणे दोन लाख मतदारांचा सुधारित मतदान यादीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या भाजपने १३ लाख मतदारांचा मोबाईल डाटा गोळा केला असल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले. या वेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, संजय बंगाले आदी उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT