IPS Mumakka Sudarshan & Bachachan Sing Sarkarnama
विदर्भ

Police Department : विदर्भात दोन IPS अधिकाऱ्यांनी केली पोलिसांना हेल्मेटसक्ती

Helmet Compulsion : चंद्रपूर, अकोला पोलिसही आले शिस्तीत

संदीप रायपूरे

Strict Rule : विदर्भातील पोलिस दलात व्यापक फेरबदल झाल्यानंतर नव्याने रुजू झालेल्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलिसांना हेल्मेटसक्ती लागू केली आहे. चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यातही हा नियम पोलिसांसाठी सक्तीचा करण्यात आला आहे. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अकोल्याचे अधीक्षक बच्चन सिंह यांनी हा नियम लागू केला आहे.

मुमक्का सुदर्शन हे नागपुरात गुन्हे शाखेचे उपायुक्त होते तर बच्चन सिंह अकोल्यात येण्यापूर्वी वाशीमचे अधीक्षक होते. नागपुरातील हायप्रोफाइल सना खान हत्याप्रकरण आणि आरटीओमधील निरीक्षकांच्या फायरिंग प्रकरणाचा तपास सुदर्शन यांनी उत्तमपणे हाताळला. तिकडे वाशीममध्ये बच्चन सिंह यांनी देखील अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपुरात सूत्रे स्वीकारताच बेशिस्त पोलिस कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. दुचाकीवर फिरणाऱ्या पोलिसांना त्यांनी हेल्मेटसक्ती केली आहे. याशिवाय शासकीय व खासगी वाहनातून फिरणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सिटबेल्ट वापरणे बंधनकारक केले आहे. असाच नियम बच्चन सिंह यांनी अकोल्यात लागू केला आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या व दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या कर्मचारी दोघांनाही त्यांनी हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे.

नागरिकांना आपण उपदेशाचे डोज देतो. पण हे करताना आपणच आधी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे दोन्ही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनीच तर नियमांचे पालन केले तर इतरांना नियमांचे पालन करण्याचे बंधन घालून देता येईल असे मुमक्का सुदर्शन आणि बच्चन सिंह यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किशोर जाधव यांची आठवण

यापूर्वी अकोल्याचे पोलिस अधीक्षक असताना किशोर जाधव यांनी पोलिसांसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक केले होते. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचे रजीस्ट्रेशन प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि विमा अशी कागदपत्र असल्याशिवाय वेतन अदा न करण्याचे आदेश जाधव यांनी दिले होते. याशिवाय वाहनांच्या नंबरप्लेटवर पोलिस असे लिहित गावभर फिरणाऱ्या बेशिस्त कर्मचाऱ्यांनाही त्यांनी वठणीवर आणले होते.

तत्कालीन वाहतूकशाख निरीक्षक दिनकर तानकर आणि त्यांचे सहकारी यांना सामान्यांपेक्षा पोलिसांच्या वाहनांची कसून तपासणी करा, असे आदेशच किशोर जाधव यांनी दिले होते. अकोल्यात पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य भवन येथे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा लर्निंग लायसन्य कॅम्पही घेतला होता. तेव्हा अकोला शहरात नितीन लोहार हे उपअधीक्षक होते तर रवींद्र भुयार हे डेप्यूटी आरटीओ होते.

जाधव यांच्यानंतर एका मोठ्या कालखंडाने पुन्हा एकदा विदर्भातील दोन जिल्ह्यात एकाच वेळी वाहतूक नियमांची सक्ती पोलिसांसाठी करण्यात आली आहे. अनियंत्रीत वेगावरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आधी पोलिसांना शिस्तीत आणल्यानंतरच मुमक्का सुदर्शन आणि बच्चन सिंह हे नागरिकांसाठी वाहतूक नियमांची सक्ती लागू करतील असे सांगण्यात येत आहे.

रजांकडे बल्लारपूरची धुरा

बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते याकडे अनेकांचे लक्ष होते. अशात मुमक्का सुदर्शन यांनी घुग्गूस पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ रजा यांना बल्लारपूर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. बल्लारपुरात गुन्हेगारीचा ग्राफ वाढला आहे. अवैध धंद्याचे प्रमुख सूत्रधार येथुनच आपला कारभार सांभाळतात. आता ठाणेदार रजा यांना हे माफिया कशी आणि कोणती ‘ट्रिट’ देतात आणि रजा त्यांना कोणती ‘ट्रिटमेंट’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT