Laxman Hake-Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ; ‘मुख्यमंत्री ओबीसींचे आरक्षण संपवत आहोत’

Rajesh Charpe

Nagpur, 01 October : लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीच्या अहवालास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता नवा वाद उफाळून येऊ लागला आहे. ओबीसी आरक्षणाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट तोफ डागली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा उद्योग मुख्यमंत्री करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांनी ओबीसींचासुद्धा आवाज ऐकावा, असेही आवाहन त्यांनी केले.

लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची बुधवारी (ता. 02 ऑक्टोबर) चंद्रपूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ते आज नागपूरला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केली. दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप केला. मात्र, माझ्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत, यातून दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे.

आमचा कुठल्याच समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. ओबीसींचे आरक्षण (OBC reservation) कायम राहावे, यासाठी लढा देत आहोत. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आंदोलनाची दखल घ्यावी. ज्या लोकांनी दलित आणि मुस्लिमांच्या आरक्षणाला विरोध केला, ते आता ओबीसींना विरोध करीत आहेत. आम्ही आमच्या हक्कासाठी कायद्यासोबतच रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, असेही हाके म्हणाले.

कायद्यात जे काही शक्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी करावे. कायद्याच्या बाहेर जाऊन शासनादेश काढला जाणार असेल तर आम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ. महाराष्ट्रात एक आधीच स्वायत्त आयोग अस्तित्वात आहे. असे असताना शिंदे समितीला डेडिकेटेड आयोग म्हणून जाहीर करणे हेच बेकायदेशीर असल्याचे हाके म्हणाले.

आम्ही झुंडशाहीच्या जोरावर कोणाला आव्हान देत नाही. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत, त्यामुळेच विरोधकांनी नैराश्येपोटी आपणास मारहाण करण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्यावर गोळ्या घातल्या, तलवारी चालवल्या तरी घाबरणार नाही. मला काल जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा पूर्वनियोजित कट होता. मारहाण करणाऱ्यांचा सीडीआर तपासावा, असेही ते म्हणाले.

मी कधीही महामानवाच्या समोर शिवीगाळ केली नाही. मनोज जरांगे यांच्याप्रमाणे कायदा हाती घेतला नाही. महाराष्ट्रातील ओबीसी शांत आहे, याचा अर्थ तुम्ही काहीही करावे, असा होत नाही. ओबीसींच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न राज्यात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT