Anup Dhotre Sarkarnama
विदर्भ

Anup Dhotre : अनुप धोत्रेंची खासदारकी संकटात? भ्रष्ट व्यवहार केल्या प्रकरणी न्यायालयात याचिका

सरकारनामा ब्यूरो

योगेश फरपट

Anup Dhotre News : अकोल्याचे भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या विरोधात निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धोत्रे यांच्या विरोधात एका मतदाराने थेट उच्च न्यायालयात याचिका केली आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चा पेक्षा जास्त खर्च धोत्रे यांच्या प्रचारादरम्यान झाल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील एका मतदाराने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केल्याचा आरोप केला असून त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

लोकसभा निवडणूक Lok Sabha Election लढणार्‍या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 77 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच, उमेदवाराने निवडणुकीवर किती खर्च करायचा, याची मर्यादाही निश्चित असते.

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती. परंतु, धोत्रे यांनी या कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहितीही लपवून ठेवली, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

मर्यादेपेक्षा अधिक खर्च?

धोत्रे Anup Dhotre यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये व भाजपने 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. हा एकूण खर्च 87 लाख 72 हजार 932 रुपये होतो. मात्र, भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या.

धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशेबात देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी ही माहिती दडवली. हा खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होते, असा दावा चव्हाण यांनी याचिकेत केला आहे. चव्हाणतर्फे  अ‍ॅड. संदीप चोपडे कामकाज पाहणार आहेत.

खासदारकी रद्द करा

लोकसभेसाठी 95 लाख रुपये इतका खर्च करता येतो. धोत्रे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार त्यांनी 81 लाख रुपयांच्या आसपास तर त्यांच्या पक्षाने ६ लाखांच्या आसपास खर्च केला. त्यामुळे त्यांचा या निवडणुकीचा एकुण खर्च हा 87 लाख 72 हजार 932 इतका होता, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले आहे. यात त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या जाहिरातींचा खर्च 4 लाख 18 हजार 971 इतका असल्याचा दाखविला होता.

मात्र, प्रसार माध्यमांमध्ये त्यांनी जाहिराती दिल्या. तेथील जाहिरातींचे दर याचिकाकर्त्याने मिळविले व त्यानुसार धोत्रे यांनी 5 लाख 67 हजार रुपये इतका खर्च त्यांनी जाहिरांतीवर केला आहे. असा दावा चव्हाण यांनी या याचिकेमार्फत केला आहे. त्यामुळे धोत्रेंनी खोटी माहिती सादर करून निवडणूक आयोगाची व जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे धोत्रे यांची खासदराकी रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी याचिकेतून केली आहे.

कायदेशीरबाबी तपासणार

खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, केंद्रीय पातळीवरुन आलेल्या जाहिरातींमध्ये माझा फोटो नव्हता, माझे नाव नव्हते. त्यामुळे त्या माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या, असे म्हणणे चुकीचे आहे. त्या जाहिराती सर्वदूर प्रसिद्ध झाल्या आहे. त्यामुळे त्यांचा माझ्या खर्चात समावेश कसा करता येईल? या विषयीचे सर्व कायदेशीरबाबी आम्ही तपासत आहोत. 

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT