Bhandara-Gondia Lok Sabha Constituency Sarkarnama
विदर्भ

Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : लोकसंग्रहाच्या बळावर डॉ. परिणय फुके यांची मैदानात उतरण्याची तयारी

Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात डॉ. परिणय फुके नशीब आजमावणार आहेत.

Atul Mehere

Lok Sabha Election 2024 : डॉ. परिणय फुके विद्यार्थिदशेत उत्कृष्ट जलतरणपटू होते. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्यांना समाजकार्याची गोडी लागली आणि सामाजिक कार्य करता करता त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. सुरुवातीला ते कोणत्याही राजकीय पक्षात नव्हते. नागपूर महानगरपालिकेची पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला, पण दुसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. ते दोन वेळा नगरसेवक झाले, त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

दरम्यान, त्यांचे काम भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी डॉ. फुके यांना भाजपमध्ये घेतले. नंतर त्यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार केले. 2014 ते 2019 या काळात अखेरच्या टप्प्यात डॉ. फुके राज्यमंत्री बनले. ते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्या काळात त्यांनी लोकसंग्रह वाढवला. त्याच बळावर ते आता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाव (Name)

डॉ. परिणय रमेश फुके

जन्मतारीख (Birth Date)

5 जानेवारी 1981

शिक्षण (Education)

एमबीए, पीएच.डी.

कौटुंबिक पार्श्‍वभूमी (Family Background)

डॉ. परिणय यांचे वडील रमेश फुके व्यावसायिक होते. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या पत्नीचे नाव व डॉ. परिणीता फुके असे असून, त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय ? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता ? (Lok Sabha Constituency)

भंडारा-गोंदिया

राजकीय पक्ष कोणता (Political Party affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढवल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Constested or Political Journey)

डॉ. परिणय फुके यांनी महाविद्यालयीन जीवनातच सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात नशीब आजमावले. नगरसेवक पदासाठी त्यांनी आधी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले. पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आपले काम सुरूच ठेवले. दुसऱ्या प्रयत्नात ते नगरसेवक झाले. 2007 ते 2017 या कालावधीत ते नगरसेवक राहिले. दरम्यान, 2016 पासून विधान परिषदेवर ते होते. 16 जून 2019 ते 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास खात्यांचे ते राज्यमंत्री होते.

भाजप नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या परिसरातून डॉ. फुकेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षाचे बळकटीकरण व पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र आणले. फडणवीसांच्या आमदारकीच्या वरील कालावधीत त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा, लोकांच्या समस्या व वैद्यकीय अडचणी, सामाजिक कामे व प्राथमिक स्वरूपाच्या सर्व मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.

राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची कौटुंबिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या डॉ. परिणय फुके यांनी दांडग्या जनसंपर्काच्या बळावर वयाच्या 26व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत प्रवेश केला. अवघ्या 26 मतांनी ही निवडणूक जिंकत त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धूळ चारली. नगरसेवकपदाच्या पहिल्याच कारकिर्दीत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात चौफेर विकासकामे केली. प्रभागातील घरोघरी नळ योजना, सिमेंट रस्त्यांसह सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कामांत महिलांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्यांना पत्नी डॉ. परिणीता यांची मोलाची साथ लाभली.

प्रभागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी व परिवाराशी असलेले व्यक्तिगत, जिव्हाळ्याचे संबंध व त्याचा डॉ. परिणय यांच्यावर असलेला विश्‍वास, नगरसेवकपदाच्या पहिल्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांची पोच पावती म्हणून 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. तब्बल चार हजार मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली. दुसऱ्या टर्ममध्ये प्रभागातील 600 लोकांना घरकुल मिळवून दिले. 1500 नागरिकांना मालकी हक्क पट्टे मिळवून दिले. अंबाझरी येथे निसर्गाच्या सांनिध्यात असलेल्या 1800 एकरांत अर्बन फॉरेस्ट डेव्हलप करून बायोडायव्हर्सिटी पार्क हा प्रकल्प मंजूर करून प्रत्यक्षात सुरू केला.

नगरसेवकपदाच्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामांची दखल घेऊन भाजपने डॉ. फुके यांना 2016 मध्ये भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत खरी लढत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांशी होती. भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित परिश्रमामुळे डॉ. फुके यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 48 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड त्यांनी भाजपकडे खेचून आणला.

विधान परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदियातील विकासकामांना चालना देण्याच्या दृष्टीने व तळागाळातील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील असंख्य गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन जनसंपर्क वाढवला. विकासकामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणला. प्रामुख्याने शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणीपुरवठा, घरकुल, रस्ते, सिंचन, पायाभूत सुविधा व उद्योगाकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध करून विकासकामांचे जाळे विणले.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे ? (Social Work in the Constituency)

डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस उपलब्ध करून दिला. जिल्ह्यातील वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. धान खरेदी केंद्रांवरील गैरव्यवहार बंद करणे, ओबीसींच्या हक्कांसाठी आंदोलन, धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. पर्यटन विकास, तसेच आरोग्य सुविधा यावर विशेष लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करवून घेतली. राज्यातील पोलिस पाटलांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव बऱ्याच कालावधीपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. राज्यमंत्री झाल्यानंतर डॉ. फुके यांनी 28000 पोलिसपाटलांचे नेटवर्क आपल्या पक्षाकडे वळवले. राज्यातील 40000 होमगार्डना सहकार्य केले.

2019 मधील निवडणूक लढवली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Constested 2019 Lok Sabha Election)

डॉ. परिणय फुके यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

2019मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation In Constituency)

भंडारा जिल्ह्यातील एकट्या साकोली विधानसभा मतदारसंघात नव्हे तर भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यातही डॉ. परिणय फुके यांचा दांडगा जनसंपर्क आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतरही ते डगमगले नाहीत. ज्या विधानपरिषद मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केलेले आहे, त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी आजतागायत संपर्क कायम ठेवला आहे. कार्यकर्त्यांच्या व गावागावांत नागरिकांच्या भेटीगाठी, मेळावे, विविध कार्यक्रमांतून त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये संपर्क वाढवला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात काम करताना डॉ. परिणय फुके यांनी सोशल मीडियाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. व्हॉट्सॲप, X (ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांतून ते लोकांच्या संपर्कात असतात. त्यांनी मतदारसंघात केलेली कामे असो किंवा राज्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया असो, सोशल मीडियावर डॉ. फुके नेहमी सक्रिय असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे कुणाची सुपारी घेऊन कुणाची ‘तुतारी’ वाजवत आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे, असे वक्तव्य डॉ. परिणय फुके यांनी केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. नानांसारखा फालतू माणूस मोदींबद्दल बोलू शकत नाही, असे प्रत्युत्तर डॉ. फुके यांनी दिले होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले तर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru)

देवेंद्र फडणवीस

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

मातब्बर नेते नाना पटोले भाजप सोडून गेल्यानंतर पक्षसंघटना विस्कळीत झाली होती. कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. आता भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे काही खरे नाही, असे बोलले जाऊ लागले होते. अशा परिस्थितीत डॉ. परिणय फुके यांनी विस्कळीत झालेला भारतीय जनता पक्ष सांभाळला. कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणाचे काम जोमाने केले. हा लोकसभा मतदारसंघ बांधण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्याची फलश्रुती म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले. मेंढे यांना खासदार बनवण्यात डॉ. फुके यांचा सिंहाचा वाटा आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा जिल्हा असला तरीही डॉ. फुकेंनी या दोन जिल्ह्यांत केलेल्या कामगिरीमुळे आज भाजपला सोडून येथील राजकारण होऊ शकत नाही.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

डॉ. परिणय फुके यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला ते नागपूर महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. तेव्हापासून हे दोन जिल्हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिलेले आहे. पण आगामी निवडणुकीसाठी त्यांचा ‘बाहेरचा उमेदवार’, ‘नागपूरचे पार्सल’ म्हणून विरोधकांकडून प्रचार सुरू आहे. पक्षातीलच काही विरोधकही ‘बाहेरचे पार्सल’ म्हणून त्यांना हिनवताना दिसतात.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn't get chance to contest Lok Sabha election what will be the consequencs)

डॉ. परिणय फुके यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे. ते स्वतः कुणबी समाजाचे आहेत आणि ओबीसी नेते आहेत. 2019 च्या निवडणुकीत खासदार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सध्या डॉ. फुके आणि सुनील मेंढे यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचेही अधूनमधून बघायला मिळते. पण पक्षाने आदेश दिला तरच ते ही निवडणूक लढतील, अन्यथा पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यात ते कोणतीही कसर सोडणार नाहीत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT