Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde sarkarnama
विदर्भ

Mahayuti News : भाजप शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला डच्चू देणार?

Rajesh Charpe

Nagpur News, 30 July : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुती एकत्रच लढणार असल्याचे जाहीर केले असले, तरी नागपूर जिल्ह्यातील एकही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजपचे संपूर्ण जिल्ह्यात नेटवर्क आहे. यापूर्वी बारापैकी 11 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी रोखठोक भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी घेतली आहे.

त्यामुळे आता जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर जिल्ह्यात महायुतीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागांची मागणी केली आहे. यापैकी रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत. हा अपवाद वगळता जिल्ह्यात सेना आणि राष्ट्रवादीला भाजप डच्चू देणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी विदर्भातील भाजपच्या (BJP) कोअर कमेटीची बैठक घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. लोकसभेतील पराभवाची चर्चा केल्यानंतर विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी सूचना सर्वांना देण्यात आली होती.

याच बरोबर विधानसभेसाठी करावयाच्या कामाची यादी सर्वांना सोपवण्यात आली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपने लढावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. भाजप शहर व जिल्हा आणि मंडळ पातळीवर बैठका घेणार आहे. त्यानुसार येत्या शनिवारी सुरेश भट सभागृहात शहर कार्यकारिणी व रविवारी कोराडी येथील नैवेद्यम सभागहात ग्रामीण कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. शिंदे सेनेने रामटेक आणि उमरेड विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. येथे निरीक्षकसुद्धा नेमले आहेत. उमरेडमध्ये भाजप दोन वेळा जिंकून आली आहे. राजू पारवे हे काँग्रेसमधून निवडून आले होते.

ते आता शिवसेनेत आहेत. त्यांना उमरेड मतदारसंघावर दावा करता येणार नसल्याचा युक्तीवाद भाजपतर्फे केला जात आहे. रामटेक ही एकमेव जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नाही.

काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता असलेला उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे ही जागासुद्धा भाजपनेच लढावी अशी जोरदार मागणी भाजपने केली आहे. रामटेक लोकसभा शिवसेनेला सोडून चूक केली. ही जागा भाजपने गमावली. आता परत तीच चूक करण्यात येऊ नये, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT