Indraneel Naik & Bhavna Gawali. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Mahayuti : भावना गवळींचा पत्ता कापण्याचा इंद्रनिल नाईकांचा असाही प्रयत्न

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिमची मागा मागितली बंजारा समाजासाठी

सतीश हरिश्चंद्र येटरे

Indranil Naik : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चांगलीच ओढताण पाहायला मिळत आहे. राज्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांमध्ये दिलजमाई असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र, स्थानिक पातळीवर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसल्याचे दिसत आहे.

महायुतीच्या रविवारी (ता. 14) झालेल्या यवतमाळातील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी भावना गवळी यांची राजकीय पतंग कापण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी ‘मै मेरी झाँशी नही दूँगी’ असे म्हणत शिंदे गटाचीच दावेदारी लोकसभा मतदारसंघावर असल्याचा संदेश दिला.

आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर बंजारा समाजाचाच दावा असल्याचे सांगत हा मतदारसंघ अजित पवार गटाच्याच पदरी पडणार असल्याचे सूतोवाच केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मकर संक्रांतीनिमित्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा शहरातील एका खासगी हॉटेलात झाला.

निवडणुकीच्या आधी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन होऊन निवडणुकीला समोर जाताना हवेदावे नसावे, हा यामेळाव्या मागचा उद्देश होता. मात्र मेळाव्यात महायुतीतील उमेदवारीवरुन असलेला सुप्त संघर्ष दिसून आला. महायुतीच्या मेळाव्याला संबोधन करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची थेट मागणी केली. त्यांनी या मतदार संघावर प्रबळ दावेदारी असल्याचेही सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा मतदारसंघातील सामाजिक स्थितीचा दाखलाही त्यांनी दिला. याशिवाय आताच उमेदवार जाहीर करावा, म्हणजे प्रचार करता येईल, अशी मागणीही केली. त्यामुळे मेळाव्यासाठी सभागृहात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत साद दिली. नाईकांच्या या मागणीने मंचावर उपस्थित नेत्यांची चांगलीच अडचण झाली. ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवाराची मागणी करीत त्यांच्या पक्षाचा अप्रत्यक्ष दावा असल्याचा संदेश दिला.

आमदार नाईकांच्या मागणीचा धागा पकडत ‘मै मेरी झाँशी नही दूँगीं’ म्हणत पाच वेळा खासदार असून येत्या निवडणुकीतही आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे खासदार भावना गवळी यांनी भाषणातून स्पष्ट करून टाकले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची ‘राखी’ बहुचर्चित आहे. त्या रक्षाबंधनाला मतदार किंवा राजकीय नेत्यांना राखी पाठवायला विसरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मूळ शिवसेनेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांना राखी बांधत ‘भैय्या राखी के बंधन को निभाना’, अशी अनेकदा आर्तसाद घातली.

यंदाच्या निवडणुकीतही भावना गवळी तोच कित्ता गिरविणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. रविवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर बंजारा समाजाचा दावा करताच खासदार गवळी यांनी बहिणीची कोणतीही अडचण नाही, कुठेही हस्तक्षेप नसल्याचे म्हणत सर्वांना भावनिक सादही घातली.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT