Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

Yavatmal-Washim Political News : महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला हा मतदारसंघ न आल्यास भावना गवळी यांचे तिकीट कापले जाऊ शकते.
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : हाडाचे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक तथा निकटवर्तीय वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील पुंडलिकराव गवळी हे राजकीय क्षेत्रात मजल-दरमजल करीत वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. त्यांच्या शब्दाला राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात मोठे वजन होते. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून भावना गवळी यांनी त्यांचा वसा चालवण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

पुंडलिकराव गवळी यांच्या निधनाने वाशीम लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भावना गवळी यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवले. आक्रमकता आणि वडिलांनी दिलेले राजकारणाचे बाळकडू त्यातून भावना गवळी या तावून सुलाखून निघाल्या होत्या. त्यांच्या वक्तृत्वशैलीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा प्रभाव असल्याने प्रचारसभांना प्रचंड गर्दी व्हायची. 1999 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव देशमुख यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर भावना गवळींची राजकीय कारकीर्द बहरत गेली. त्यांनी माजी मंत्री मनोहर नाईक, शिवाजीराव मोघे, हरिभाऊ राठोड, मागील निवडणुकीत माणिकराव ठाकरे आदी दिग्गज नेत्यांचा पराभव केला.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Satara NCP : जे गेलेत त्यांची चिंता करू नका..! बालेकिल्ला टिकवण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांच्या हातात...

तब्बल पाचवेळा मातब्बर राजकारण्यांना लोकसभेच्या रणांगणात लोळवल्याने त्यांना जनतेत त्या ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. प्रत्येकवेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. परंतु त्या खचल्या नाहीत. त्यांनी आपले काम निष्ठेने सुरू ठेवले. संसदेच्या अनेक समित्यांवर कार्यरत राहून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. दरम्यानच्या काळात त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागले. त्यातही त्यांनी संयम ढळू न देता मार्ग काढलाच. असे असले तरी त्यांच्या अडचणी अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दोनच दिवसांपूर्वी त्यांना 19 कोटींच्या व्यवहाराच्या एका प्रकरणात आयकर विभागाने नोटीस बजावून विवरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत गवळी यांनी शिंदे सेनेशी घरोबा केला. त्यामुळे कुणी गद्दार म्हणूनही त्यांना हिणवले. त्याही परिस्थितीत गवळी यांनी संतुलन कायम ठेवले. आता त्या त्यांच्या आयुष्यातील सहाव्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. शिंदे सेनेशी केलेला घरोबा गवळींचे राजकीय अस्तित्व टिकवतो का, की लोकसभेच्या मैदानात पुन्हा बाजी मारत त्या ‘जायंट किलर’ही उपाधी कायम राखतात का, हे आगामी काळात कळेल.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना दणका; आयकर विभागाची मोठी कारवाई

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आता भाजप दावेदारी सांगत आहे. त्यामुळे महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला हा मतदारसंघ न आल्यास भावना गवळी यांचे तिकीट कापले जाऊ शकते. महायुतीने केलेल्या सर्वेक्षणात गवळी यांची बाजू कमकुवत असल्याचे पुढे आले आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे गवळींना तिकीट न मिळाल्यास त्या स्वस्थ बसतात, की स्वतंत्र अथवा दुसऱ्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवतात, हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. असे असले तरी तिकीट आपल्यालाच मिळेल आणि विजयही आपलाच होईल, असा भक्कम विश्वास त्यांना आहे. त्यातूनच त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.

नाव (Name)

भावना पुंडलिक गवळी

जन्मतारीख (Birth date)

23 मे 1973

शिक्षण (Education)

पदव्युत्तर पदवी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

खासदार भावना गवळी यांचे वडील दिवंगत पुंडलिकराव गवळी हे खासदार होते. त्यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले. गेल्या पाच टर्मपासून भावना गवळी या वाशीम आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. खासदार गवळी या पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांच्यापासून विभक्त आहेत. त्यांना अपत्य नाही. आई शालिनीताई गवळी या वयोवृद्ध असून त्यांच्या मूळगावी रिसोड येथील निवासस्थानी वास्तव्याला असतात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे त्यांचे गजानन ऑइल मिल नावाचे प्रतिष्ठान तथा व्यवसाय आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

यवतमाळ-वाशीम.

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट).

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Thackeray Review Meeting: वर्धा, रामटेक, यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी ठाकरे आखणार रणनीती ? गुरुवारी बोलावली आढावा बैठक

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

भावना गवळी या पहिल्यांदा 1999 मध्ये वाशीम लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 2004 मध्ये वाशीम आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 अशा तीन टर्म त्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. वाशीम लोकसभा मतदारसंघात त्यांनी अनुक्रमे अनंतराव देशमुख, मनोहर नाईक, तर यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात त्यांनी हरिभाऊ राठोड, शिवाजीराव मोघे आणि माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांचा पराभव केला. या निवडणुका त्यांनी शिवसेना पक्षाकडून लढवल्या. या काळात त्यांनी विविध संसदीय समित्यांमध्ये कार्य केले.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Yavatmal : खासदार भावना गवळी यांना पुन्हा नोटीस; यावेळी कुणी मागितला हिशोब?

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी त्यांनी गर्ल्स स्पोर्ट्स असोसिएशन रिसोड, महिला विद्यार्थी संघटन रिसोड, युवक विकास संस्था रिसोड, भावना अॅग्रो प्रॉडक्ट पार्टीकल बोर्ड देगाव, शिवसेना महिला संपर्कप्रमुख विदर्भ अशा विविध संस्था आणि आघाड्यांवर सक्रिय सहभाग घेत योगदान दिले. ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षण व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले आहे.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 मधील निवडणुकीत खासदार भावना गवळी या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत निवडून आल्या. माणिकराव ठाकरे यांच्याविरोधात त्यावेळी प्रचंड नाराजी होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी या निवडणुकीला सामोरे जाताना पुरेशी तयारी केली नव्हती. याशिवाय मोदीलाटेने गवळी यांना त्यावेळी तारले, असेही बोलले जाते. असे असले तरी गेली तीन टर्म गवळी यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रभावी चेहराच दिला गेला नाही. त्याचाही अप्रत्यक्ष फायदा गवळींना झाला. विरोधक प्रत्येकवेळी या मतदारसंघात निर्णायक असलेल्या कुणबी-मराठा मतांची मोट बांधण्यात अपयशी ठरले. ही बाजूही गवळी यांच्या पथ्थ्यावर पडल्याने त्यांचा विजय झाला.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
Parliament Winter Session : लोकसभेत यामुळे दिसला भावना गवळींचा संताप...

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

खासदार भावना गवळी यांचा जनसंपर्क दोन टर्मपूर्वी अतिशय चांगला होता. मात्र नंतरच्या काळात तो दिवसेंदिवस कमी होत गेला. या टर्ममध्ये तर गवळी निवडून आल्यानंतर सुरुवातीची तीन वर्षे त्यांचे यवतमाळ जिल्ह्यात दर्शन दुर्लभ झाले होते. त्यामुळे सोशल मीडियातून नागरिक आणि विरोधकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले होते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी हरवल्या आहेत, शोधून आणणाऱ्यास योग्य ते बक्षीस मिळेल, अशा आशयाच्या पोस्ट त्यावेळी झळकल्या होत्या. आता मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी गावोगावी भेटी, विकासकामांचे भूमिपूजन, पदाधिकारी, शिवसैनिकांच्या भेटींचा सपाटा लावला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

खासदार भावना गवळी यांचा सोशल मीडिया फारसा प्रभावी नाही. त्यांचे सोशल मीडियाची फेसबुक साईट, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आदी ठिकाणी अकाऊंट आहे. मात्र त्यावर त्या फारशा सक्रिय नसतात. बोटावर मोजण्याइतपत पदाधिकारी त्यांचा सोशल मीडिया सांभाळतात. केवळ प्रसिद्धीपत्रकांच्या भरवशावर त्यांच्या प्रसिद्धीचा डोलारा आहे. रिल्स वगैरेपासून त्या दूर असतात.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : Bhavana Gawali
NCP Politics : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कुणाची?

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

महाविकास आघाडीचे सरकार पडले, तेव्हा खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे गटात जात त्यांची पाठराखण केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सडकून टीका केली होती. यापूर्वी त्यांनी पीकविमा कंपन्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तीव्र आंदोलन केले होते. अलिकडेच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनातील त्यांचे भाषण लक्षवेधी ठरले होते. त्यांनी यवतमाळ येथील 302 कोटींच्या अमृत योजनेचाच प्रशासनाने 302 (खून) केल्याचा आरोप केला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

वडील पुंडलिकराव गवळी.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

भावना गवळी या आक्रमक नेत्या आहेत. त्या प्रखर आंदोलक म्हणून ओळखल्या जातात. आजही शिवसेनास्टाइल आंदोलनासाठी त्या ओळखल्या जातात. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा त्यांना प्रचंड अभ्यास आहे. शिवाय एकाही पक्षाकडे सध्या तरी गवळी यांना टक्कर देईल, असा प्रभावी चेहरा नाही. कुणबी-मराठा हे समीकरण जुळविण्यात त्या नेहमीच यशस्वी ठरतात. यवतमाळकर जनतेच्या 302 कोटींच्या अमृत योजनेच्या झालेल्या बट्ट्याबोळावर त्यांची आगपाखड सुरू असते. शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने बोलत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधलेली राखी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. शिवाय यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाची लक्षणीय मते आहेत. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत राठोड यांनी गवळींना मोलाची मदत केली. आता त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. हीच स्थिती वाशीम जिल्ह्यात आहे. तेथील नेत्यांशीही गवळी यांचे पटत नसल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाशी काडीमोड घेत त्यांनी शिंदे सेनेसोबत जवळीक केली. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर आहे. या निर्णयाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावले गेले आहेत. ईडीचा ससेमिरा आणि १९ कोटी रुपयांच्या हिशेबाची इनकमटॅक्स विभागाची नोटीस यामुळे गवळी यांच्या प्रतिमेला काहीसा धक्का बसला. निवडून आल्यानंतर मतदारसंघात दर्शन दुर्लभ या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

भावना गवळी यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष अथवा दुसऱ्या एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com