Nagar Parishad : यवतमाळ नगर परीषदेत झालेला घनकचरा निविदा प्रक्रियेमधील भ्रष्टाचार राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परीषदेत चांगलाच गाजला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आठवडाभरात मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.
सरकारने दिलेले कारवाईचे आश्वासन तर अधिवेशन संपताच हवेत विरेल आहे; पण डोल्हारकर यांच्याविरद्ध कारवाई होण्याऐवजी त्यांना पदोन्नती मिळावी, यासाठी एका आमदाराच्या मनात प्रेम व आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. यवतमाळचे भाजप आमदार मदन येरावार यांनी डोल्हारकर यांना पदोन्नती द्यावी अशी शिफारस करणारे पत्रच दिले आहे. त्यामळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधान परिषदेच्या सभागृहात यवतमाळचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी हे प्रकरण ‘डाऊन टू अर्थ’ असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांना कारवाईची सूचना केली होती. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. याउलट यवतमाळ नगर परीषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना पदोन्नती देऊन त्यांची यवतमाळ जिल्ह्यातच नियुक्ती करून घेण्याचा डाव आखण्यात आला आहे. अशात आमदार येरावार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पत्र देऊन टाकले आहे.
डोल्हारकर यांची बदली यवतमाळच्या जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन अधिकारी या रिक्त पदावर करण्याची विनंती त्यांनी केली आहे. हा प्रकार म्हणजे यवतमाळकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. डोल्हारकर यांच्या ताब्यात सध्या केवळ यवतमाळ शहरातील एक नगर परिषद आहे. जिल्हा सहआयुक्त पदाची सूत्रे हाती आल्यानंतर त्यांच्या व त्यांच्या मागे असलेल्या ‘गॉडफादर’चे खास ‘नेटवर्क’चे ‘कव्हरेज’ संपूर्ण जिल्ह्यात ‘रिचेबल’ होणार आहे, यात शंकाच नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे कचरा घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. कामांच्या वाटपातही अनियमितता करीत असल्यामुळे कंत्राटदार संघटना न्यायालयात गेली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे यवतमाळकर हैराण झाले आहेत. या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ नगर परिषदेसमोर धरणे देत आहे. मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध काँग्रेस रस्त्यावर उतरल्याने डोल्हारकरांनी सर्व वार झेलण्यासाठी राजकीय ढाल पुढे केली आहे.
अशातच सत्ताधार आमदार मदन येरावार डोल्हारकर यांच्या मदतीला देवदुतासारखे धावून आले आहेत. त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला कुठे ‘फिट’ करायचे हे देखील मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले विजयकुमार पंडीतराव सरनाईक (मुख्याधिकारी गट-अ श्रेणीचे अधिकारी) हे बदलीला पात्र असल्याने त्यांची यवतमाळच्या मुख्याधिकारीपदी नियुक्त करण्यात यावे आणि डोल्हारकरांना यवतमाळातच जिल्हा सहआयुक्त करावे असा सल्लाही त्यांनी शिंदे यांना दिला आहे.
आमदार येरावार यांचे हे पत्र यवतमाळमध्ये व्हायरल झाले आहे. वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यासोबत आमदारांचा हा ‘दोस्ताना’ अनेकांना खटकला आहे. राजकीय युद्धनीतीत निपूण असलेले डोल्हारकरांचे ‘गॉडफादर’ कदाचित आमदार येरावार यांचा वापर करीत आपला हेतू साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असावे, असेही बोलले जात आहे. डोल्हारकरांच्या या ‘गॉडफादर’ला राजकीय युद्धतीनी चांगलीच ठाऊक असल्याने बहुदा ‘देवेंद्रास्रा’चा वापर करून ते मनासारखे करून घेतीलही. परंतु या सगळ्या घडामोडीत मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश आणि एकूणच विधिमंडळ कामकाजातील आश्वासनाचा अवमान होईल, त्याचा उत्तरदायी कोण? असा प्रश्न नक्कीच निर्माण होणार आहे.
विधिमंडळापेक्षा डोल्हारकरांसारखे अधिकारीच वरचढ ठरतात हाच संदेश महाराष्ट्राला जाणार आहे. असे होऊ नये यासाठी आता शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू चौधरी आणि ओम तिवारी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोल्हारकरांविरुद्ध कारवाईचे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. कारवाई न झाल्याने हे प्रकरण आता आश्वासन समितीकडे जाणार आहे. तातडीने कारवाई करण्यासाठी दाद मागणार असल्याचेही ओम तिवारी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.