Kishore Jorgewar : व्यासपीठावरून सन्मान स्वीकारताना, भाषण देताना, मोठ्या रुबाबात असणाऱ्या नेत्यांना आजवर सर्वांनीच पाहिले आहे. अशावेळी त्यांच्या पालकांचे डोळे आनंदाने पाणावतात. परंतु चंद्रपुरात एक प्रसंग असाही घडला, ज्यावेळी आपल्या मातोश्रीचा नागरी सत्कार होताना पाहून आमदाराच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हे आमदार आहेत चंद्रपूरचे किशोर जोरगेवार. अपक्ष आमदार असलेल्या जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई उपाख्य अम्मा यांचा राजमाता जिताऊ पुस्कार प्रदान करीत नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार व्यासपीठाच्या समोरील बाजूस असलेल्या प्रेक्षकांच्या रांगेत बसले होते.
संवाद प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात विदर्भस्तरीय हिरकणी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्त्री शक्ती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रपूरच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधारकर अडबाले, मनोहर पाहुणकर, सुधा पोटदुखे, सुनील कुंबे, संजय धवस, प्रा. विजय बदखल, अमित येरगुडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई (अम्मा) जोरगेवार यांना प्रदान करण्यात आला. टोपल्या विकून जोरगेवार कुटुंबीयांचा सांभाळ करणाऱ्या अम्मा यांनी काबाडकष्ट करीत आपल्या मुलांचे संगोपन केले. त्यांना उच्च शिक्षण मिळवून दिले. मुलगा किशोर जोरगेवार याला आमदार पदापर्यंत नेले. आता चंद्रपुरातील अनेक गरजूंनाही अम्मा काम देत आहेत. आर्दश माता म्हणून अम्मा यांनी समाजात स्थान निर्माण केले आहे. यासाठी त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना रमाई समता पुरस्कार, अल्का ठाकरे यांना सावित्रीबाई ज्ञानज्योती पुरस्कार, प्रतीक्षा शिवणकर यांना राणी हिराई पुरस्कार, रुबीना पटेल यांना पुण्यश्लोकअहल्यादेवी होळकर सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार किशोर जोरगेवार हे मंचावर नसल्याने उपस्थितांमध्ये काही काळ चर्चा रंगली. प्रेक्षक तर्कविर्तक लावत होते. मात्र, आयोजकांनी आमदार किशोर जोरगेवार यांना मंचावर आमंत्रित करून दोन शब्द बोलण्याची विनंती केली. यानवेळी आपल्या अम्माला सन्मानित होताना पाहण्यासाठी आपण कार्यक्रमाला आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आईच्या सन्मानाचा क्षण आयुष्यातील सर्वांत सुखद आणि आनंददायक असल्याचे ते म्हणाले. अम्मा परिवाराचे पोट भरण्यासाठी जंगलात जाऊन बांबू तोडायच्या. जंगलात राबणारी आई आपण पाहिली आहे. आपण लहान असताना मांडीवर घेऊन अम्मा फूटपाथवर बांबूपासून तयार केलेल्या टोपल्या विकायच्या, अशी आठवण जोरगेवार यांनी सांगितली.
किशोर जोरगेवार हे बालपणी रुग्णालयात असताना आईने मीठ-पोळी कशी खाऊ घातली, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. अशा आईचा सन्मान होताना पाहणे हे आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे ते म्हणाले. आईचा हा नागरी सन्मान पाहता यावा, यासाठी आपण प्रेक्षकात बसून होतो, असेही जोरगेवार यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.