Bhavana Gawali News  Sarkarnama
विदर्भ

Bhavana Gawali News : 19 कोटी गैरव्यवहार प्रकरण; खासदार गवळींनी दिला हिशोब!

प्रसन्न जकाते

Yavatmal News : महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 19 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील सर्व माहिती, हिशोब शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा खासदार भावना गवळी यांनी सादर केला आहे. अकोला येथील आयकर विभागाच्या कार्यालयात यासंदर्भात भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)

खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या नावे आयकर विभागाने नोटीस बजावली होती. भावना गवळी यांना आज अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. भावना गवळी यांना 26 कोटी रुपयाच्या रोख रकमेचा हिशोब मागविण्यात आला होता.

भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी अकोला येथील आयकर विभागाच्या कार्यालयात मागविण्यात आलेले सर्व कागदपत्र दाखल केले आहेत. नेमके कोणते स्पष्टीकरण आणि कागदपत्र गवळी यांच्यावतीने दाखल करण्यात आलीत याबद्दल त्यांच्या प्रतिनिधी किंवा आयकर विभाग अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. शुक्रवार, 5 जानेवारीपर्यंत नोटिसला उत्तर देण्याची मुदत खासदार भावना गवळी यांना देण्यात आली होती. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत 19 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी आयकर कायद्याच्या कलम 131 (1A) कलमानुसार 29 डिसेंबर 2023 रोजी गवळी यांना नोटीस बजावण्यात आली होती.

अशात दिलेल्या मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी गवळी यांच्यावतीने उत्तर दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) वाशिमच्या रिसोडमधील देगावमध्ये कारवाई करत ट्रस्टचे संचालक सईद खान यांना अटक केली होती. ट्रस्टला बेकायदेशीररीत्या कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात देखील गैरव्यवहार झाला. यात सर्व प्रकरणात 19 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

या घोटाळ्याबरोबर 7 कोटी रुपयांच्या रोख रकमेचादेखील गैरवापर झाल्याचा ठपका ईडीने भावना गवळी यांच्यावर ठेवला होता. ईडीच्या नोटिसनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न करत त्यांनी गवळी यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्या विरोधातच गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी तीन वेळा नोटीस बजावूनही गवळी ईडीसमोर चौकशीसाठी आल्या नव्हत्या.

लोकसभा उमेदवार म्हणून नापसंत?

पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी याप्रकरणी भाजपवर टीका केली आहे. भावना गवळी यांना लोकसभेच्या उमेदवार म्हणून भाजपाची नापसंती आहे. त्यामुळेच भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस बजावण्यात आल्याचे ते म्हणाले. गवळी यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात प्रचंड विरोध आहे, हे भाजपच्या लक्षात आले आहे.

2024 मधील लोकसभा निवडणुकीत पोहरादेवीचे शक्तीपीठ व बंजारा समाज देखील भावना गवळी यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, असे महंत सुनील महाराज यांनी सांगितले. यंदा आपण पोहरादेवी शक्तीपीठाच्या आशीर्वादाने लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुनील महाराज यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाच्या मतांची संख्या मोठी आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT