Sarkarnama Podcast : विधानसभेत विरोधी पक्षांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमदार नितेश राणे यांनी एक छायाचित्र आणि व्हीडीओचा संदर्भ देत विरोधकांनाच अडचणीत आणलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत विरोधकांना आणखी गोत्यात आणलं. विरोधी पक्षांना एक पाऊल मागे घ्यायला लावणाऱ्या या व्हिडिओने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर याच संदर्भाने केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री फडणवीस शांत राहिले. महाजन यांच्यासोबत फोटोत सलीम कुत्ता दिसत आहे, असा आरोप खडसे यांनी केला होता. (Latest Marathi News)
1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचं व्हीडीओमधून दिसतंय. सलीम कुत्ता याच्या निमित्तानं भारताचा मोस्ट वाँटेड डॉन, कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम गॅंग आणि शिवसेना हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मागे जाऊन मुळात संघर्ष केव्हा आणि कसा सुरू झाला ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
सतत धावणाऱ्या, अहोरात्र जागणाऱ्या, आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली, की आजही लोक क्षणभर थबकतात. जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात, आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली. तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला.
मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईकरांसह समस्त मराठीजनांच्या मनात आदराचं स्थान आहे. त्याउलट गुन्हेगारी आणि दहशतीचं साम्राज्य उभारणाऱ्या दाऊदला शिक्षा मिळावी, अशी टोकाची तीव्र भावना जनसामान्यांमध्ये उमटते. दोन वेगवेगळ्या कक्षांमध्ये सक्रिय असणाऱ्या या दोघांचं आयुष्य एका टप्प्यावर गुंतागुंतीचं झालं. सत्ता, राजकारण आणि अंडरवर्ल्डच्या पटलावर मुंबईचे अंतरंग आणखी गडद झाले.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 1960 च्या दशकात उदयाला आली. महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारतीयांचं वर्चस्व झुगारून मराठी जनांना नवसंजीवनी देणारी लाट शिवसेनेने आणली. त्यांच्या ठाकरी शैलीतल्या भाषणांनी उत्तर भारतीय स्थलांतरितांना धडकी भरवली. तरणाबांड दाऊद तेव्हा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव करून भय आणि हिंसेच्या जोरावर गुन्हेगारी विश्व उभारण्याच्या तयारीत होता. डोंगरीच्या गजबजाटात त्याने अंडरवर्ल्डचा मार्ग शोधला होता.
दाऊदचे संबंध असलेल्या पठाण गँगवर पोलिसांनी जबर कारवाई केली होती. दाऊदने मोठा भाऊ शाबीर इब्राहिम कासकर याच्यासोबत स्वतःची टोळी तयार केली. शबीरला प्रतिस्पर्धी पठाण टोळीने मारल्यानंतर तो त्याच्या टोळीचा एकमेव बॉस बनला, ज्याला डी-कंपनी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर तो प्रामुख्याने सोन्याची तस्करी, रिअल इस्टेट, खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतला होता.
समद खानच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना हवा असल्याने तो 1986 मध्ये भारतातून दुबईला पळून गेला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये दाऊदने त्याच्या सेकंड-इन-कमांड छोटा राजनच्या मदतीने त्याच्या टोळीचा आणखी विस्तार केला, त्याच्या टोळीचे पाच हजारांपेक्षा जास्त सदस्य होते आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करत होते. 1993 च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड म्हणून भारत सरकारने त्याचे नाव दिले होते . हल्ल्यांनंतर तो दुबईतून कराचीला पळून गेला, जिथे तो आजही राहतो, असे म्हणतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 च्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षाचा रागरंगच बदलून टाकला. प्रादेशिक चेहरा बाजूला सारून प्रखर हिंदुत्व स्वीकारलं. बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 यादिवशी पाडली गेली. जगभरात हा प्रसंग लाइव्ह प्रसारित झाला. त्यातल्या दृश्यात मशिदीचे घुमट खाली कोसळताना दाखवलं गेलं. तसेच कारसेवक घुमटावर चढलेले दिसले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगल उसळली. यात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. खोलवर रुजलेल्या धार्मिक द्वेषामुळे या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद झाली. उत्तर हिंदुस्थान हादरल्यानं त्याची कंपनं मुंबईपर्यंत जाणवली. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.
बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत भयंकर दंगली उसळल्या. त्यात जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली. यातून मुंबई सावरते न् सावरते तोच १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनी ती पुन्हा हादरली. या साखळी बॉम्बस्फोटांमुळं मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश दहशतीच्या छायेखाली होता. अवघ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला या दहशतवादी हल्ल्यामुळं तडे गेले. ठाकरेंनी या हल्ल्याच्या तीव्र शब्दांत निषेध केला.
या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदला देशद्रोही म्हटलं. हीच योग्य वेळ पाहून ठाकरे यांनी संधी साधली. दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील स्पर्धा भडकावी म्हणून ठाकरेंनी जणू आगीत तेल ओतले. मुंबईतल्या गुन्हेगारीवर टीका करताना त्यांनी छोटा राजनचा नामोल्लेख टाळला. दाऊदवर मात्र सडकून टीका केली. ठाकरेंची अंडरवर्ल्डमध्ये फूट पाडण्याची ही चाल यशस्वी ठरली. त्यानंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्यातली गुन्हेगारी वर्चस्वाची स्पर्धा टोकाला गेली.
'त्यांच्याकडं दाऊद असेल, तर आमच्याकडे गवळी आणि नाईक हे 'हिंदू डॉन' आहेत. ही आमची मुलं आहेत', असं ठाकरे म्हणाले. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मेळाव्याला उपस्थित असणाऱ्यांनी जणू ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानंतर अमर नाईक आणि अरुण गवळी म्हणजे मुंबईचे दाऊदला तोडीस तोड उत्तर, असं सर्रास मानलं जाऊ लागलं. बाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणामुळं गुंडांच्या टोळ्यांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडली.
दाऊदचा बदला घेण्यासाठी छोटा राजनची मदत घ्यावी, असंही ठाकरेंना काहींनी सुचवलं. बाळासाहेब ठाकरेंनी या मेळाव्यात छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजे याचा नामोल्लेख टाळला. तरी बाळासाहेब ठाकरेंनी दाऊदविषयी केलेलं वक्तव्य छोटा राजनच्या पचनी पडलं नव्हतं. छोटा राजननं माध्यमांना पत्र देत 'दाऊदला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, ठाकरेंनी फक्त राजकारणातच लक्ष घालावं' असं म्हटलं होतं.
बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात छोटा राजनचा नामोल्लेख टाळून केलेली खेळी यशस्वी ठरताना दिसू लागली. परंतु छोटा राजनने केलेल्या या कृतीविषयी बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात याबाबत कधीच उल्लेख केला नाही आणि छोटा राजनला माफ केलं नाही. पुढे राजनने दाऊदशी वाद झाल्यानंतर आपली चूक दुरुस्त केली. अनेक मुलाखतींमध्ये तो ठाकरेंविषयी खूप आदरानं बोलायचा, पण 'मातोश्री'वरून राजनला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुढं दाऊद आणि छोटा राजन यांच्यात फूट पडली. दोघांममध्ये वाद विकोपाला पोहोचले. एकमेकांना संपवण्यासाठी संधी शोधत राहिले. छोटा राजनने मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपींना संपवण्याचा सपाटा लावला होता.
बाळासाहेब ठाकरे यांच्या या भाषणाचा सर्वाधिक राग दुबईत बसलेल्या दाऊदच्या डी-कंपनीला आला आणि त्यांनी शिवसेनेला धडा शिकवण्याचे ठरवले. बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील परिस्थिती बदलली होती. डी कंपनी पहिल्यासारखी राहिली नव्हती. कंपनीला छोटा राजनची उणीव जाणवत होती. दाऊदला दुबई सोडून कराचीला जावे लागले. अशा परिस्थितीत शकील बाबूमियाँ शेख ऊर्फ छोटा शकीलच्या हाती सूत्रे आली. तो दाऊदचा जवळचा माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेवर काहीतरी खणखणीत उत्तर देण्याची दाऊद टोळीची इच्छा होती. त्यासाठी खूप चर्चा झाली. प्लॅन झाले.
शिवसेनेवर आघात होईल, अशी काहीतरी योजना आखली गेली. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना हात लावल्यास त्याचा मुस्लिमांवर परिणाम होईल यावर डी कंपनीचं एकमत झालं. यानंतर डी कंपनीने 1993 च्या दंगलीत जे शिवसेना नेते आघाडीवर होते, त्यांना टार्गेट केले. तशी योजनाच छोटा शकीलने आखली. पहिला वार मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर झाला. 17 डिसेंबर 1998 रोजी मिलिंद वैद्य यांच्यावर सहा बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. यातून ते वाचले, परंतु मिलिंद वैद्य यांच्यावर पुन्हा तीन महिन्यांच्या आत नऊ हल्लेखोरांनी एके-56 मधून 4 मार्च 1999 मध्ये गोळीबार केला.
वैद्य यांचे नशीब बलवत्तर ठरले. परंतु त्यांचे तीन मित्र हल्ल्यात मृत्युमुखी पडले, तर सहा जण जखमी झाले. शिवसेनेवर दाऊदच्या डी कंपनीचे हल्ले सुरूच राहिले. मिलिंद वैद्य यांच्यानंतर ९ डिसेंबर 1999 रोजी शिवसेना शाखाप्रमुख विवेक केळकर, 19 एप्रिल 2000 रोजी शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, 21 एप्रिल 2000 रोजी शाखाप्रमुख बबन सुर्वे, 24 सप्टेंबर 2004 रोजी रमाकांत हडकर, 11 एप्रिल 2001 रोजी शाखाप्रमुख राम आंगळे यांची हत्या करण्यात आली. या सर्व हल्ल्यांमुळे शिवसेना नेते भीतीच्या छायेत गेले.
1994 हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळेच नाही, तर इतर अनेक गोष्टींमुळं संस्मरणीय ठरलं. मुंबईच्या संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीनं नवीन कालखंडाची ती सुरुवात होती. मुंबईच्या गुंडाराजचं विश्वच वेगळं. तिथं त्यांचेच नियम असतात, कालगणना असते, बक्षीस आणि शिक्षाही त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार असतात. 1994 पर्यंतचा, म्हणजेच 'दाऊद दुबईला पळून जाईपर्यंतचा' एक टप्पा होता. यातच मार्च 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला पहिल्यांदाच महापालिकेच्या पलीकडे जाऊन मोठं यश मिळालं. शिवसेना-भाजप युतीनं विधानसभा भवनावर भगवा ध्वज फडकावला. काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. बाबरी मशिदीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या धार्मिक विद्वेषाच्या भावनेमुळं शिवसेना-भाजप युतीला पहिल्यांदा एकत्रित विजय मिळू शकला, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातील संघर्ष याकाळात तीव्र होत राहिला. मुंबईचं दुभंगलेलं रूप प्रकर्षाने दिसू लागलं. जमिनीवर लख्ख प्रकाशात लोकशाही होती, तर जमिनीखाली गडद अंधारात गुन्हेगारीचं विक्राळ जाळं पसरत होतं. त्याचे पडसाद पुढे अनेक वर्षे उमटत राहिले. अंडरवर्ल्डशी निगडित अनेक गोष्टी मुंबईत सांगितल्या जातात, त्यातून उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नच उभे राहतात. ठाकरेंनी सामान्य मराठी माणसांना अन्यायाची तीव्रतेने जाणीव करून दिली. त्यामुळे प्रादेशिक संघर्ष तीव्र झाला, समाजघटकांमध्ये दुही निर्माण झाली, याचा गैरफायदा घेत दाऊदसारखे डॉन तयार झाले का, मुळात दाऊद हा अशाच सामाजिक-आर्थिक अन्यायाचा परिणाम होता का, असे प्रश्न मुंबईतल्या गल्लीबोळांसारखे चक्रव्यूहात टाकणारे आहेत. भल्याबुऱ्या अनिश्चित वातावरणाची आठवण करून देणारे आहेत.
किंबहुना ठाकरे- दाऊद संबंध हा विषय आता पुढल्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. ठाकरेंच्या आक्रमक राजकारणामुळेच नकळत का होईना दाऊदसारख्या अंडरवर्ल्ड डॉनला हातपाय पसरता आले, असा आरोपही झाला. सध्या दाऊदच्या गुंडांशी शिवसेनेचा संबंध असल्याचं बोललं जातंय.
वादविवादांना अंत नाही, पण एक गोष्ट नाकारता येणार नाही, ती म्हणजे सत्तेच्या गोटात राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यात टक्कर होते. मुंबईसारख्या कधीही झोपी न जाणाऱ्या शहरात तर असा वर्चस्वाचा संघर्ष अविरत सुरू असतो. त्याला चांगली किंवा वाईट अशी एकच छटा कधीच नव्हती आणि नसेलही. ठाकरे-दाऊद हा विषय फक्त दोन व्यक्तींपुरता भासत असला तरी वास्तवात तो मुंबई शहराचा सूक्ष्म आरसा आहे. मुंबईची ओळख, तिथली चिंताजनक परिस्थिती, समाजातील विरोधाभास असं सारं काही यानिमित्ताने विचार करायला भाग पाडणारे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.