Yashomati Thakur Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : बोलू न दिल्याने यशोमती ठाकूर भडकल्या; म्हणाल्या, अफूची गोळी खाल्ली का?

Amar Ghatare

Amravati News : महाराष्ट्रातील राजकारण सध्या भलत्या दिशेला जात आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे, परंतु अधिवेशनाचे कामकाज अरेरावी करत चालविल्या जात आहे. हिटलरशाही करणाऱ्या अशा सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे, असा संताप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. सरकारचे कामकाज पाहता त्यांनी अफूची गोळी खाल्ली आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही, असं त्या म्हणाल्या.

नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शुक्रवारी (ता. 8) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलण्यापासून रोखल्यानंतर आमदार ठाकूर यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. हे राज्य विधिमंडळाचे सभागृह आहे, की सर्कस अशी टीका त्यांनी केली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी त्यांना नकार दिला. अशाप्रकारे वागणूक देणे म्हणजे उद्धट अरेरावी असल्याचे त्या म्हणाल्या.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांची बाजू मांडतीलच. सरकारने या संदर्भात आमदारांना बोलू द्यायला पाहिजे, असे आमदार ठाकूर म्हणाल्या.

शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं, याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे. परंतु, सरकार ज्या पद्धतीने काम करतंय, त्यामुळे ते नशेत काम करत असल्याचं दिसतंय, असा तीव्र संतापही व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार विधिमंडळाला आपल्या बापाचं घर समजतात. परंतु, हे लोकशाहीचं मंदिर आहे, हे सरकारनं ध्यानात ठेवावं. सरकार आणि सभागृह कायद्यानुसार चालते. परंतु सध्याचं सरकार मनमानी पद्धतीने कामकाज चालवत आहे, अशी टीका यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली.

खायचे आणि दाखवायचे वेगळे...

सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. यांना प्रफुल पटेल चालतात, परंतु नवाब मलिक (Nawab Malik) चालत नाहीत. या प्रकारातूनच सरकारचा दुटप्पीपणा दिसतोय. ज्यांना नवाब मलिक चालत नाही, त्यांना मंत्रिमंडळातील बाकीचे कसे चालत आहेत. सरकार आपल्या सोयीनुसार ठरवत आहे, मंत्रिमंडळात कोण असायला पाहिजे आणि कोणी नको. राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी खरं वर्चस्व कोणाचं आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. हेच नेते ठरवत आहेत की, सभागृहात कुणाला बोलू द्यायचं आणि कुणाला गप्प करायचं, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.(Winter Session)

सरकारच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आमची तोंडं गप्प करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, आम्ही सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे मुद्दे तितक्याच आक्रमकपणे मांडू. वेळ पडली तर आम्हीही विधान भवनाच्या पायऱ्यांवर किंवा रस्त्यावर उतरत आंदोलन करू, मात्र सामान्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न उचलल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT