Akola Lok Sabha Election Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : अकोल्यातील भाजप उमेदवाराची नावनिश्चिती टळली

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यापूर्वी सर्वच पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा दौरा स्थगित झाला आहे. अमित शाह जर आले असते तर कदाचित अकोला लोकसभेचा उमेदवार ठरला असता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. गृहमंत्री शाह यांचा दौराच स्थगित झाल्याने तूर्तास अकोला लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण? यावर अद्यापही प्रश्न चिन्ह कायम आहे.

काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्याला वेग आला आहे. यात भाजपकडूनही ‘मिशन 45’ अंतर्गत राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यासाठी येणार होते. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अकोला लोकसभा उमेदवार अद्यापही निश्चित झाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यातील स्थितीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून शाह यांच्या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, दौराच रद्द झाल्याने तूर्तास अकोला लोकसभेत भाजपच्या उमेदवाराबाबत अस्पष्टता कायम आहे. ‘वंचित’कडून अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी अगोदरच केली आहे. दुसरीकडे भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे हे निवडणूक लढविणार नसल्याचे निश्चित आहे. अशात अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून ‘वंचित’ला कोण टक्कर देणार यासाठी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

अमित शाह यांच्या अकोला बैठकीत विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा होणार होती. लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणीसुद्धा बैठकीत होण्याची शक्यता होती. त्यासाठी अमित शाह यांचा पश्चिम विदर्भातील हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात लढण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अमित शाह यांच्या दौऱ्यात स्पष्ट होणार होते. मात्र, उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या अनेक जणांची निराशाच झाली आहे.

संजय धोत्रे यांच्यानंतर या मतदारसंघात अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. जिल्हा भाजपकडून अनुप संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्याची मागणीही करण्यात येत आहे. ऐनवेळी अकोला लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण असणार? हे अद्यापही निश्चित नाही. या मतदारसंघात भाजपकडून अनेक जण इच्छुक आणि अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकीकडे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी घोषित करून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. भाजपकडून अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर भाजपची तयारी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा कोण असणार, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात निर्णय होण्याची शक्यता अधिक होती.

लोकसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तगडे आवाहन देण्यासाठी भाजपकडून तितक्याच तोडीचा उमेदवार लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून भाजपच्या विरोधात अकोल्यात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटही अकोल्यातील विकासाच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडत आहे. भाजपमधील काही नेते उराशी अगदी अहंकार बाळगून आहेत. स्वत: अतिहुशार आणि इतरांना ते कचऱ्यासारखी वागणूक देत आहेत. अकोला भाजपमध्ये परस्परविरोधी दोन गटही आहेत. त्यामुळे भाजपसाठी लोकसभेचा रस्ता इतका सोपा नाही, असे सांगण्यात येत आहे. भाजपमधील अशा अहंकारी नेत्यांच्या पापाची फळे कदाचित अनुप धोत्रे यांना विनाकारण भोगावी लागू शकतात.

अनुप धोत्रे हे तसे स्वभावाने चांगले आहेत. भाजपमधील इतर अहंकारी आणि मुजोर नेत्यांसारखे त्यांचे नाही. त्यामुळे त्यांना लोक पसंत करू शकतात. परंतु त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. खासदार संजय धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यातील राजकारणात सक्रिय होते. धोत्रे यांनी कधीही विषारी जातीवाद केला नाही. कधीही मुजोरी केली नाही. पदाचा अहंकार केला नाही. त्यामुळे आजही अगदी टोकाचा विरोधकही त्यांच्याबाबत चांगलेच बोलतो. धोत्रे यांनी कार्यकर्ते जपले. असाच प्रकार आमदार गोवर्धन शर्मा यांच्याबाबतही होता. त्यामुळे अनुप धोत्रे यांना हे समजून घ्यावे लागेल की पदाचा, राजकारणाचा अहंकार आणि मुजोरी फार काळ टिकणार नाही. जनता तो टिकू देत नाही, कारण ‘पब्लिक सब जानती है’ आणि याहीपेक्षा ‘भाजप सब जानती है’ त्यामुळे अनुप धोत्रे यांनी सामान्यांतील सामान्यांशी आपली नाळ प्रेमाने जुळवून ठेवणेही गरजेचे आहे. त्यामुळे कोणाचे ऐकायचे आणि कोणाच्या मनासारखे वागायचे हे त्यांनाच ठरवावे लागणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांना निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. अशातच भाजपला अकोल्याचा गड अभेद्य ठेवायचा आहे. भाजपला केंद्रात सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी एक एक लोकसभेची जागा महत्त्वाची ठरणार आहे. एकही जागा हातून जाऊ द्यायची नाही, असा निश्चय भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळेच अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दमदार उमेदवार भाजपला निवडावा लागणार आहे. यासाठी प्रसंगी काही कठोर निर्णय आणि नाराजीही पत्करावी लागण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT