Road Issue : अकोला शहरातील एका रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच मंगेश काळे यांच्याकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.
शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर-येवता रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ आणि ‘निर्भय बनो’ जन आंदोलनाअंतर्गत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणा दरम्यान मंगेश काळे यांनी मित्र मंडळाच्यावतीने दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.
मलकापूर भागातील रस्त्याच्या मागणीसह पाइपलाइन दुरुस्ती व पथदिव्यांची कामे त्वरित पूर्ण व्हावी, ही मागणी आंदोलनदरम्यान करण्यात आली आहे. बांधकाम विभाग, मनपा आयुक्त, जिल्हा प्रशासन, अधिकारी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी मलकापूरमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला होता. मागणी पूर्ण न झाल्याने शिवसैनिक आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय कराळे, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी नगरसेवक राजेश मिश्रा, राहुल कराळे, मंगेश काळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले.
चर्चा सुरू असताना अचानक मंगश काळे यांनी सोबत आणलेली डिझेलची बाटली अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. काळे यांच्या हातातील आगपेटी त्यांनी हिसकावून घेतली. रस्ता त्वरित व्हावा म्हणून शासन, प्रशासनास लोकप्रतिनिधींनी पाचदा निवेदन दिले आहे. अनेकवेळा आंदोलने केली आहेत. प्रशासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली. परंतु तुकाराम चौक ते मलकापूर या अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे हा पवित्रा घ्यावा लागल्याचे मंगेश काळे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्यात शिवसेनेच्या या आंदोलनानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचे काम पूर्ण करणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतरही बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास यापुढे अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.