Nagpur, 15 March : सध्या महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये इनकमिंगची स्पर्धा लागली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, असे भाकितही वर्तविले जात आहे. यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देऊन धुलिवंदनाच्या दिवशी राजकीय धुरळा उडवून दिला. त्यावर आता त्यांचेच सहकारी आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नानांनी दिलेली ऑफर योग्य आहे. मात्र, त्यांनी घाई केली असे सांगून सस्पेन्स आणखी वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नक्की काय चाललंय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी धुलिवंदनाच्या दिवशी सर्व राजकीय मित्रांना होळीच्या शुभेच्या देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यांना आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री करू, असेही नानांनी म्हटले होते. हा गंमतीचा भाग असला तरी त्याचे राजकीय पडसाद राज्यभरात उमटले.
नाना पटोले यांनी दिलेल्या ऑफरवर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, नाना पटोले यांनी शिंदे आणि पवार यांना ऑफर दिल्याचे मी माध्यमांतून ऐकले आहे. राजकारणात कोणीच कोणाच कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. वेळेनुसार राजकारण चालत असते. सध्या महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस पाहता, केव्हा काय होईल, हे कोणालाच सांगता येत नाही. कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले, याचीसुद्धा कल्पना करता येत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री काँग्रेसची ऑफर स्वीकारणारच नाहीत, याची शाश्वती कोणाला देता येत नाही. महायुती सत्तेवर असली तरी सर्वच जण नाराज आहेत. एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात हा असंतोष वाढतच जाणार आहे. हे बघता नाना पटोले यांनी ऑफर देण्याची घाई केली, एवढेच मी सांगू शकतो, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाची भूमिका हास्यास्पद
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण हास्यास्पद आहे. केवळ निवडणुकीचा खर्च वाढेल; म्हणून दोषी ठरवले जात नसेल तर न्याय मिळणे दुरापास्त होईल. उद्या एखाद्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने खर्चाची भूमिका घेतली तर खुनातील आरोपी मोकाट फिरू शकतो. गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. तो लोकप्रतिनिधी असो वा नसो सर्वांना एकसमान न्याय दिला पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.