Amravati News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विरुद्ध सनातन बोर्ड असा नवा वाद पेटला आहे. महायुती सरकारमधील मस्त्य व बंदरविकास मंत्री नितेश राणेंनी वक्फ बोर्डाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून देशात आणि राज्यात जसा मुस्लिम समाजाचा वक्फ बोर्ड आहे, तसाच देशात सनातन बोर्ड स्थापन होणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन बोर्डाची सध्यातरी काही आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं असतानाच आता भाजपच्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
मंत्री व भाजपचे आक्रमक नेते नितेश राणेंनंतर आता माजी खासदार नवनीत राणा यांनीही सनातन बोर्डाविषयी मोठं विधान केलं आहे.याचवेळी त्यांनी वक्फ बोर्ड बंद करावा अशी भूमिकाही मांडतानाच देशात सनातनी बोर्ड स्थापन करावा,अशी आग्रही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या,केंद्रात आमचं सरकार असताना वक्फ बोर्ड समाप्त झाला पाहिजे.यात लाखो करोडो जमीन लाटण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.तसेच राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू करण्यासाठी सरकारनं पहिलं पाऊल उचलतानाच विशेष समिती गठीत करण्यात आल्याच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात लव्ह जिहाद खूप वाढलेला आहे. या कायद्यामुळे येणाऱ्या पिढीला मोठा फायदा होणार असल्याचं मतही माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे.तसेच अनेक समित्या लव्ह जिहादवर काम करत होत्या,त्यामुळेच यातील अनेक मुलींना आम्ही वापस आणलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना सहकार्य मिळत होते.पण आता लव्ह जिहाद कायदा येईल, तेव्हा अनेक मुली वाचतील असा दावाही राणा यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लव्ह जिहाद आणि त्या माध्यमातून होणारे धर्मांतरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलामार्फत या घटनेचा सातत्नेया विरोध केला जात आहे. या घटना रोखण्यासाठी आता महाराष्ट्रातील महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे‘चा मुहूर्त साधून राज्याच्या गृह विभागामच्या वतीने लव्ह जिहाद, बलपूर्वक होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी एक विशेष समितीची स्थापना केली आहे.
गृह खात्याच्या वतीने समिती स्थापन करण्याचा शासनादेश काढला आहे. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्याच देखरेखीत लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक तर सदस्य म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव याशिवाय गृह विभागाच्या सहसचिवाचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सनातनी बोर्डाच्या मागणीवर परखड मत व्यक्त केले होते. त्यात ते म्हणालेले, प्राचीन काळापासून एक विशिष्ट भारतीय जीवनपध्दती तयार केली आहे. आणि तिला जे मानतात, त्यांना आपण सनातन मानतो. ही जी आमची प्राचीन संस्कृती आहे,जिच्यात खूप असं प्राचीन ज्ञान आहे. त्याच्यात खूप मोठ्या प्रकारचं असं सायन्स आहेत. त्याचा स्वीकार करण्यात कुठल्याही प्रकारचा अपराधबोध असण्याचं काही कारण नसल्याचंही फडणवीसांंनी सांगितलं होतं.
हा त्यात अजून काही संशोधन करायचं असेल,अभ्यास करायचा असेल तर एखादं बोर्ड असू शकतं. पण वक्फ बोर्ड आहे म्हणून सनातन बोर्ड हवं असं काही असण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे काही नेत्यांचे कान टोचले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.