
Kolhapur, 15 February : इचलकरंजी नगरपालिकेची मुदत संपून चार वर्षे झाले असून नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी इचलकरंजीला महापालिका घोषित करण्यात आली आहे. पण, महापालिकेची पहिली निवडणूक अजूनही झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने इच्छुक भावी नगरसेवक आणि माजी नगरसेवक हतबल झाले आहेत.
महापालिकेची निवडणूक (Corporation Election) आज होईल, उद्या होईल यामुळे आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या इच्छुकांनी रोजगार स्वीकारला आहे. इतकेच नव्हे, तर काही माजी नगरसेवक ठेकेदार बनले आहेत. गेल्या चार वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्याने मतदारांची कामे करण्यासाठी रोज हजारो रुपये खर्च होत आहेत, त्यातच निवडणुकाही होत नसल्याने खर्चाने हतबल झालेल्या इच्छुकांनी मात्र पर्याय शोधायला लागले आहेत.
इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. त्याचा कार्यकाळ 2021 मध्ये संपला. सुमारे 68 जागांसाठी जवळपास 400 उमेदवारांनी आपले भवितव्य पणाला लावले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Election) 2021 नंतर रखडल्याने इचलकरंजी नगरपालिकेवर प्रशासक नेमला गेला आहे. मध्यंतरीच्या काळात महायुती सरकारने इचलकरंजीला महानगरपालिका घोषित केली आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी निधीच्या माध्यमातून मतदार संघात भरपूर विकास कामे केली.
पराभूत झालेल्या उमेदवारांनी पुढच्या वेळेला नक्की विजयी होणार, हा आत्मविश्वास ठेवत सलग नऊ वर्षे अविरत समाजसेवा सुरू ठेवली आहे. नळाला पाणी येत नसल्यापासून ते पोलिस ठाण्याच्या पायरीपर्यंत प्रत्येक कामात इच्छुकांनी सर्वसामान्य नागरिकाला मदत करण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे गणेशोत्सव, शिवजयंती, महाप्रसाद, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचे कार्यक्रम, शिवाय इतर कार्यक्रमांसाठी देणग्या देणं मागील नऊ वर्षांपासून सुरूच आहे.
या सर्वांचा परिणाम म्हणून इच्छुकांसह माजी नगरसेवकही आर्थिक चटके सहन करत आहेत, त्यामुळे निवडणूक लागेल, त्यावेळी केवळ पैसा मिळवणे हेच ध्येय आता या लोकप्रतिनिधींपुढे राहिले आहे. पण, सध्या काहींनी स्वतःचा उद्योग, तर काहीजण ठेकेदार बनले आहेत.
इचलकरंजीमधील लोकप्रतिनिधींच्या संपर्कातीलच नगरसेवक उपाशी आहेत. राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामाचं श्रेय घेण्याचे प्रयत्न माजी आणि भावी नगरसेवकांकडून सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जलद गतीने मदत देऊन मीच तुमचा तारणहार आहे, असे दाखवण्याचा प्रकार केला जात आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.