NCP and BJP Sarkarnama
विदर्भ

Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकून राष्ट्रवादीने वाढवलं भाजपचं टेन्शन!

NCP, BJP and Nagpur Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या तीनही मतदारसंघात भाजप सातत्याने लढत आहे. सर्वच मतदारसंघात यापूर्वी भाजप जिंकली आहे.

Rajesh Charpe

Nagpur Assembly Election 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यश मिळालेलं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षाने मतदारसंघावर दावे करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

आता त्यांच्या पक्षाची विदर्भात किती ताकद आहे हा जरी चर्चेचा मुद्दा असला तरी नागपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा करून राष्ट्रवादीने भाजपचं टेन्शन वाढवलं असल्याचं बोललं जात आहे.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल(Prafull Patel) यांच्या नागपूर येथील निवसस्थानी नागपूर जिल्ह्याची बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर नागपूर तर जिल्ह्यातील काटोल-नरखेड विधानसभेवर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कुठल्याही परिस्थिती दोन जागा पदरात पाडून घ्यायचेच असे ठरवण्यात आले असल्याचे समजते.

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे तर उत्तर नागपूरमध्ये माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत आमदार आहे. उत्तर नागपूर अनुसूचित जातीसाठी राखवी आहे. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आमदार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना प्रफुल पटेल पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही होते. त्यानुसार बोलणीसुद्धा त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केली होती. मात्र शेवटपर्यंत काँग्रेसने होकार दिला नाही. आपले दुर्लक्ष झाले आणि काँग्रेसने शेवटपर्यंत ताटळकत ठेवले. आपलीच चूक झाली याची कबुली पटेल यांनी नंतर दिली होती. आता ते महायुतीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या तीनही मतदारसंघात भाजप(BJP) सातत्याने लढत आहे. सर्वच मतदारसंघात यापूर्वी भाजप जिंकली आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः पश्चिमचे आमदार होते. उत्तर नागपूर डॉ. मिलिंद माने यांनी एकदा भाजपला जिंकून दिले आहे.

काटोलमध्ये झालेल्या काका-पुतण्याच्या लढाईत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. ते भाजपात परतले आहेत आणि काटोलमध्ये कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीने दावा केलेल्या तीनही मतदारसंघात लढण्यास भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत.

अनेकांनी तयारीसुद्धा सुरू केली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या दाव्याने जागा वाटपाच्या वेळी मोठे मतभेद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाटाघाटीच्यावेळी प्रफुल पटेल कार्यकर्त्यांसाठी किती ताणून धरतात यावर राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT