Sangram Kote Patil Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli NCP : पदाधिकारी आवर्जुन भेटले तत्कालीन प्रदेशाध्यक्षांना, पण नमके कारण काय?

प्रसन्न जकाते

Gadchiroli NCP : स्थळ.. पुणे. निमित्त..राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. मेळावा आटोपताच गडचिरोलीतील सुमारे दीडशे युवा कार्यकर्त्यांनी लगबग सुरू असते. पुण्यावरून परत येत असताना हे सर्व कार्यकर्ते आवर्जुन शिर्डीत मुक्काम करतात. कारण एकच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संग्राम कोते पाटील यांची भेट.

वाचून आश्चर्य वाटले असेल, पण ही बाब सत्य आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पुण्यात झाला. या मेळाव्याला गडचिरोलीतून दीडशे युवा कार्यकर्ते पुण्यात गेले होते. पुण्यातून परत येत असताना त्यांनी संग्राम कोते पाटील यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. कोते पाटील यांनीही तितक्यात आपुलकीने सर्व कार्यकर्त्यांचे शिर्डीत जंगी स्वागत केले व या सर्वांच्या जुन्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला. मग काय विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीपासून महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर या सर्वांची प्रदीर्घ चर्चा रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष होते. प्रदेशाध्यक्ष असताना कोते पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी अजितदादांच्या पाठीशी युवा कार्यकर्त्यांची फौजच उभी केली. प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत असताना कोते पाटील यांचे अनेक युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी निकटचे संबंध होते. त्यामुळेच शरद पवारांपासून अजितदादा वेगळे झाल्यानंतर विदर्भातील बहुतांश युवा कार्यकर्ते दादांसोबत गेलेत. विदर्भातील युवा कार्यकर्ते दादांसोबत जाण्यामागे संग्राम कोते पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेले कामही महत्वाचे ठरले आहे.

दादांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांना पुण्यात आल्यानंतर आपल्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षांच्या भेटीची प्रबळ इच्छा झाली. त्यामुळे मेळावा आटोपताच सारे तत्काळ कोते पाटील यांच्या भेटीसाठी शिर्डीकडे रवाना झालेत. गडचिरोलीतील युवा कार्यकर्त्यांकडून कोते पाटील यांनी यावेळी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. अलीकडेच अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक आटोपली आहे. मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूकही पार पडली. गडचिरोलीत जिल्ह्यातील अनेक गावे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सिमावर्ती भागात आहेत. अशात त्या त्या राज्यातील राजकारणाचा पूर्व विदर्भात किती परिणाम होत आहे, यावरही चर्चा करण्यात आली.

लवकरच देशात लोकसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ घातली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षसंघटन कसे बळकट करता येईल, याबद्दल कोते पाटील आणि गडचिरोलीतील युवा पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ विचारमंथन केले. शरद पवारांसोबत आणि शरद पवारांव्यतिरिक्त असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यातील अंतरावरही काहींनी मत मांडले.

सगळ्यांची एकच इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी पक्षातील अनेकांची इच्छा आहे. पवारांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री अशी फलकबाजी होतच असते. दादांच्या समर्थकांपैकी अनेकांनी ते योग्यवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे सूतोवाच केले आहे. कोते पाटील यांच्यासह गडचिरोलीतील युवा कार्यकर्त्यांनीही यावेळी सगळ्यांची एकच इच्छा असल्याचे नमूद केले व शिर्डीत साईचरणी हिच प्रार्थना केली.

Edited By : Prasannaa Jakate

SCROLL FOR NEXT