Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Praful Patel : लोकसभेतील पराभवाचा प्रफुल पटेलांचा राग जाईना; ‘तुमचा खासदार ‘बाबाजीचा ठेंगा’ देणार’

Rajesh Charpe

Tumsar, 28 September : लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदियाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिल्याने प्रफुल पटेल यांची नाराजी अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे त्यांनीच महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाची हमी घेतली होती.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात झालेल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच महाविकास आघाडीचा खासदार तुमच्यासाठी काही करणार नाही, ‘बाबाजीचा ठेंगा‘ देणार, असे सांगून आपला संताप व्यक्त केला.

प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, आपण जेव्हा 1991 मध्ये निवडून आलो होतो, तेव्हा बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मतदारांची मागणी होती. ती पूर्ण करण्यात आली. हे करताना जातीपातीचे राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो. आजही जिल्ह्यातील विकासाचे कामे कोणी केली, अशी विचारणा केल्यास भाईजी असेच उत्तर दिले जाते.

असे असताना लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तुम्ही मते का दिली, अशी विचारणा त्यांनी केली. आघाडीच्या नेत्यांनी तुमची दिशाभूल केली. संविधान बदणार असल्याची भीती दाखवली आणि तुम्ही त्याला बळी पडले. ही दुर्दैवाची बाब आहे. मतदान करताना काम करणाऱ्या नेत्याची ओळख ठेवा. कोणाला मत देत आहोत याचे भान ठेवा. आमची इज्जत करा असे आवाहन त्यांनी केले.

पटेल म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदणार असल्याचे सांगून महाविकास आघाडीने तुमची दिशाभूल केली. मात्र, संविधान बदलण्याची कोणाची औकात नाही. सर्व फालतूच्या गोष्टी आहेत. संविधानाच्या भीताला घाबरून तुम्ही निवडून दिलेला खासदार जिल्ह्याच्या विकासासाठी काही करणार नाही.

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ केले आहे. अजितदादा यांनी तुमसरमधील रस्ते व इतर कामांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.

रोजगारासाठी येथे मोठा उद्योग यावा, अशी जनतेची मागणी आहे. महायुतीचे सरकार हे करू शकते, त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही भीतीला, भूलथापांना बळी पडू नका. विकास करणारे, काम करणारे कोण हे लक्षात ठेवा. मतदान करताना त्याचे भान ठेवा, असेही प्रफुल पटेल या वेळी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT