Chandrapur Bank  Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Bank Scam : चंद्रपूर जिल्हा बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत बड्या बॅंक पदाधिकाऱ्यांची नावे...

Sensational Incident : बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर झाली होती कारवाई

प्रसन्न जकाते, संदीप रायपूरे

Chandrapur News : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडतर्फची कारवाई झालेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेंडकी शाखेतील कर्मचारी अमित राऊत (वय 45) याने गळफास घेऊन व त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sacked employee of Chandrapur District Bank attempted suicide)

मृत्युशी झुंज देत असलेल्या राऊत याच्यावर नागपुरात खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आत्महत्येपूर्वी राऊत याने पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहिली असून, त्यात बँकेच्या पदाधिकारी, संचालक व अधिकाऱ्यांची नावे आहेत.

मृत व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याची बाब चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा बँकेच्या मेंडकी शाखेत 2021 मध्ये घडली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मेंडकी शाखेतील अमित राऊत, अमित नागापुरे, संजय शेंडे, यशराज मसराम तथा भोयर या पाच कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बँकेचे सहायक व्यवस्थापक मंगल बुरांडे व डोंगरवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. पाचही कर्मचारी दोषी असल्याचे चौकशीत आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मंगळवारी (ता. 5 डिसेंबर) रोजी बँकेचे बडतर्फ कर्मचारी अमित राऊत याने सुरुवातीला घरी गळफास लावून घेतला. मात्र, पतीने गळफास लावल्याचे पत्नीच्या निदर्शनास येताच त्याचा जीव वाचविण्यात यश आले. त्यानंतर अमितने घराच्या बाहेर विष प्राशन केले. त्याला चिंताजनक स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथे तो मृत्यूशी झुंज देत आहे.

अमितने पत्नीकडे एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही, असे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. चिठ्ठीत बँकेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीने ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर आणि नागपूर (Nagpur) येथील जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण चांगलेच गाजत आहे. नागपूर जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत. बँक गैरव्यवहार प्रकरणाचा खटला सध्या नागपूर न्यायालयात सुरू आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्ट निकाल सुनावणार होते. मात्र, तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने सध्या निकाल राखून ठेवला आहे.

नागपूर बँकेचे हे प्रकरण गाजत असताना चंद्रपूर जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील बडतर्फ कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करताना राऊत याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत चौकशी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याने या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची अधिक पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT