Nagpur, 10 May : नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आहेत. अशा परिस्थितीत आघाडीत काँग्रेस किती जागा सोडेल, याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सतावत आहे. खबरदारी म्हणून मित्र पक्षांसोबत सन्मानजनक आघाडी झाली नाही तर जिल्ह्यातील लहान मोठ्या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला. याकरिता सर्वच तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नागपूर जिल्हा परिषदेत झालेला बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळा, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर आधारित चित्रपटाला सिनेमागृह उपलब्ध होण्यासाठी जाणीवपूर्वक केली जाणारी अडवणूक यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद (Zillha Parishad), पंचायत समिती, नगर पंचायत, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत असताना मित्र पक्षांनी सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर काय करायचे यावरही चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे मागील निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य निवडून आले होते.
सत्ता स्थापनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र, तो काँग्रेसने फोटाळून लावला होता. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची समजूत काढण्यासाठी प्रफुल पटेल नागपूरला आले होते. मात्र, केदारांनी कोणाचेच ऐकले नाही. शेवटी एक सभापतीपद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची बोळवण करावी लागली होती. त्याकरिता खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करावा लागला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी मंंत्र्यांच्या चिरंजीवांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली होती. मात्र, पाच वर्षे त्यांनाही जिल्हा परिषदेत सभापतीपद देण्यात आले नाही. यात सलील देशमुख आणि दिनेश बंग यांचा समावेश आहे.
या प्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश उपाध्यक्ष शेखर कोल्हे, प्रदेश सरचिटणीस विनोद हरडे, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे पाटील, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली ताई टालाटुले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.