
Local Body Elections : राज्यात महायुतीची सल्ला आल्यानंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता पुन्हा एकदा नागपूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या खच्चीकरणाशिवाय ते शक्य नसल्याने केदारांच्या कट्टार समर्थकांना पळवणे भाजपने सुरू केले आहे. आतापर्यंत चार जिल्हा परिषद सदस्य भाजपने आपल्या गळाला लावले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी आणखी केदारांना धक्के देण्याचे प्लॅनिंग भाजपने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केदारांचे खास समजले जाणारे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना रातोरात भाजपने आपल्याकडे वळवले होते. त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. शेकापचे जिल्हा परिषद सदस्य समीर उमप हेसुद्धा पाठोपाठ भाजपात दाखल झाले. आठवडाभरापूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती ऊज्ज्वला बोढारे यांनी हातात कमळ घेतले. याशिवाय आणखी तीन सदस्य भाजपच्या वाटेवर आहेत. हे सर्व वेगवेगळ्या पक्षातील असले तरी केदारांचे समर्थक आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेवरचा भाजपचा भगवा केदारांनी खाली उतरवला होता. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केदारांनी ३२ जागा काँग्रेसला जिंकून दिल्या होत्या. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ तर भाजपला फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाची जिल्हा परिषद असे समीकरण साधरपणे नागपूर जिल्ह्यात दिसून येते. महायुतीची सत्ता येताच भाजपने केदारांचे खच्चीकरण करण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत केदारांना त्यांच्या सावनेर बालेकिल्ल्यात भाजपने पराभूत केले. भाजपने त्यांच्या विरोधक त्यांचे पारंपारिक विरोधक आशिष देशमुख यांना सावनेरमध्ये पाठवले. आशिष यांनी आपल्या वडील रणजित देशमुख यांच्या पराभवाचा बदला घेऊन केदारांचा हिशेब चुकता केला. आता जिल्हा परिषदेवरचे त्यांचे वर्चस्व मोडून काढल्या जात आहे.
शेजारच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदरसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही वर्चस्व भाजपने संपवले आहे. सलील देशमुख या निवडणुकीत पराभूत झाले. ते जिल्हा परिषद सदस्य होते. बंडखोरी केल्याने जिल्हा प्रमुख राजेंद्र मुळक यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. त्यांनी मागील निवडणुकीत भाजपकडून आयात केलेल्या नेमावली माटे या जिल्हा परिषदेच्या सदस्य पुन्हा भाजपात सामील होणार आहे. उज्ज्वला बोढारे यांच्यानंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आणखी एक महिला जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या संपर्कात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.