Gajanana Dalu Akola Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाला हवा अकोला लोकसभा मतदारसंघ

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीही सध्या महाविकास आघाडीच्या दूरच आहे. त्यामुळे पक्षाकडून मतदारसंघावर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. अकोला मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेसबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही दावा केला आहे. यापूर्वीही या मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही होता. मात्र त्यानंतर 'वंचित' आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू झाल्याने शिवसेनेत शांतता पसरली होती. आता पुन्हा या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी पक्षप्रमुखांकडे अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळेच सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणीसह जागावाटप, आघाडी-युती यावर खलबते सुरू आहेत. भाजप आणि काँग्रेसची पहिली यादीही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्रातील विविध पक्षांचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आलेली महाविकास आघाडीकडूनही जागावाटपावर चर्चा अद्यापही सुरूच आहे. मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील सुरू असलेली बोलणी अद्यापही पुढे गेलेली नाही. अशातच अकोला लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानेही दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार देण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आता पुन्हा ही मागणी समोर येऊ शकते. वंचित आणि महाविकास आघाडीची युती होऊन प्रकाश आंबेडकर हे लढत असतील तर त्यांचाही आम्ही प्रचार करू, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. मात्र वंचित आणि महाविकास आघाडीतील संवाद अद्यापही संपलेला नाही. तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच आता शिवसेना ठाकरे गट या मतदारसंघासाठीचा दावा अधिक आग्रहीपणे करणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या इच्छुकांचाही जोरात प्रचार या मतदारसंघात सुरू आहे. अकोला मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेस लढत असते, तर भाजप आणि शिवसेना युती असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असतो.

शिवसेनेत फुटीनंतर वेगळा झालेला शिवसेना ठाकरे गट अकोला जिल्ह्यात अधिक सक्रिय झाला आहे. भाजपच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून भाजपला सातत्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच माध्यमातून निवडणुकीची तयारीही ठाकरे गटांकडून केली जात आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाकडून संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या या यात्रेत माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले होते. गजानन दाळू गुरुजी यांच्या उमेदवारीसाठी यापूर्वीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सतत होत असलेल्या पराभवाचे कारण पुढे करीत शिवसेना ठाकरे गटाला या मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी यापूर्वीही केली आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याला देण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. आता ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. नुकतेच ठाकरे गटाचे पदाधिकारी हे मतदारसंघाच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र भेट न झाल्याने पुन्हा या मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी केली जाणार आहे. ठाकरे गटाने येथून माजी आमदार गजानन दाळू गुरूजी आणि सहकारनेते तथा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकराम ‘मामा’ ताथोड यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे यापूर्वीच केली आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी मधील बोलणी सध्या थांबलेली आहे. शिवसेनेला या अकोला मतदारसंघात भाजपला टक्कर देण्यासाठी उमेदवारी हवी आहे. त्यासाठी तयारीही शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात भाजप- वंचित आणि शिवसेना अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात काय उलथापालथ होते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT