Sanjay Gaikwad at Dhangar Melava in Buldhana. Sarkarnama
विदर्भ

Buldhana : गायकवाड म्हणाले... मंत्र्यांनाही ठोकून काढतो, सरकारलाही ठोकू शकतो

Sanjay Gaikwad : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुलडाण्यात घेतली आक्रमक भूमिका

जयेश विनायकराव गावंडे

Dhangar Reservation : आपल्या आक्रमक शैली आणि तडकफडक वक्तव्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांनी भाजपमधील अनेक नेत्यांबद्दल विधानं करीत संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. शिंदे यांच्यासोबत आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते त्यांच्या रडावर आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चक्क ‘पागल’ असं संबोधणाऱ्या आमदार गायकवाड यांनी पुन्हा असंच एक आक्रमक भूमिका घेणारं विधान केलंय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातही हे आंदोलन करण्यात येत आहे. अशाच एका आंदोलनात बोलताना आमदार गायकवाड यांनी रोखठोक भूमिका मांडली. (Shiv Sena Eknath Shinde Groups MLA Sanjay Gaikwad Stated During Protest At Buldhana For Dhangar Reservation That He Can Beat Ministers Also The Government)

धनगर समाजानं आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये धनगरांचा समावेश व्हावा, अशी या समाजाची मागणी आहे. याशिवाय धनगर आणि धनगड या शब्दामुळंही आरक्षणाचा तिढा आहे. या सर्व मागण्यांसाठी बुलडाणा येथे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनातील धनगर बांधवांना आमदार संजय गायकवाड यांनी संबोधित केलं.

आपण समाजात आमदार या नात्यानं कमी वावरतो. त्यापेक्षा सामान्य माणूस म्हणून वावरणं अधिक पसंत करतो. कुठेही अन्याय असेल तर आपण कशाचीही पर्वा करीत नाही. वेळप्रसंगी आपण मंत्र्यांनाही ठोकून काढू शकतो. अन्याय होत असेल, तर आपण सरकारमध्ये आहोत की विरोधी पक्षात याचा विचार न करता सरकारलाही ठोकू शकतो, असं विधान या वेळी आमदार गायकवाड यांनी केलं. गायकवाड यांच्या या भाषणाचा व्हिडिओ आता सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाच्या विरोधकांनी त्याचं भांडवल करणं सुरू केलंय, तर समर्थक या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचं सांगत आहेत. आमदार गायकवाड यांनी या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांची जमके स्तुती केली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा माणूस आहे की जो कोणतीही बाब योग्य असेल तर नाही कधीच म्हणत नाही. त्यामुळं धनगर समाजानं शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा’, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. आंदोलनादरम्यान केलेल्या या दोन्ही विधानांमुळं गायकवाड यांनी धनगर बांधवांच्या टाळ्याही मिळविल्या आणि गेल्या दोन दिवसांतील विधानांमुळे ते पुन्हा एकदा ‘लाइमलाइट’मध्येही आलेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT