Uddhav Thackerya on 370. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : काश्मिरातील पंडितांना आता त्यांचं हिरावलेलं सर्वस्व परत द्यावं!

प्रसन्न जकाते

Article 370 : काश्मिरातील कलम 370 संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. आता यासंदर्भातील सर्व मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर प्रश्न उरतो तो काश्मिरी पंडितांना तेथे परत नेण्याचा. आजचे युग हे ‘गॅरेंटी’चे आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांना त्यांचे सर्वस्व परत मिळवून देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

नागपूर येथे सोमवारी (ता. 11) आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, 2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटविले त्यावेळी देखील शिवसेनेने त्याचे स्वागतच केले. 2024 पर्यंत आता येथे निवडणूक घ्यायची आहे. ही निवडणूक अत्यंत भयमुक्त वातावरणात व्हावी, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

काश्मिरात आतापर्यंत झालेल्या अन्यायामुळे अनेक पंडित आपलं घर, संपत्ती सर्वकाही सोडून गेले आहेत. त्यांना त्यांचे सर्वस्व परत मिळवून देण्याची खरी गरज आता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सगळं काही स्पष्ट झालं आहे. अशात मोदींनी काश्मिरी पंडितांना त्याच्या मूळ जागी स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

काश्मिरची निवडणूक तर घ्यावी लागणारच आहे. तसे आदेशच आहेत. परंतु ही निवडणूक घेण्यापूर्वी केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मिरही आपल्या ताब्यात घ्यावा. केंद्र सरकार जर असं करू शकली तर संपूर्ण अखंड काश्मिरात निवडणूक घेता येईल, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, सध्या सरकार स्वच्छता मिशन राबवित आहे. त्यांनी पहिले आपल्या सहकाऱ्यांपासून स्वच्छतेला सुरुवात करावी. ज्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, असे डाग असलेले सोबती सरकारमध्ये आहेत. हिंमत असेल तर आधी ही स्वच्छता करावी. समुद्र किनारे वैगरे स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना गेल्या 25 वर्षांपासून समर्थपणे मुंबई महापालिका सांभाळत आहे, पुढेही बघणार आहे, असा दावाही ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर जर समुद्र किनाऱ्यांची सफाई करण्याची वेळ आली असेल तर विचार करायचा योग्य क्षण आलाय. समुद्र किनाऱ्यावर ट्रॅक्टर चालविणारा सीएम प्रथमच पाहतोय. त्यामुळं हसू येतय असा टोलाही त्यांनी लगावला.

आरक्षणावर ठाम भूमिका

मराठा आरक्षण या विषयावर शिवसेनेची भूमिका आधीच स्पष्ट करण्यात आली आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत. शिवसेनेच्या खासदारांनी याबाबत यापूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. सर्व समाजाला ज्यांना खरोखर गरज असेल त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्यांना आधीपासूनच आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या आरक्षणावर गदा न आणता नव्या प्रवर्गांना आरक्षण देण्यात यावं अशी शिवसेनेची मागणी असल्याचं ठाकरे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आधीही पाठिंबा दिला होता. आम्ही आरक्षणाच्या बाजुनेच आहोत. परंतु कुणावरही अन्याय होऊ नये अशी मागणी आहे. आपण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही यावर बोलताना ठाकरे म्हणाले की जनतेला काय सत्य आहे ते पूर्णपणे ठाऊक आहे.

धास्तीमुळे आरोप

माजी मंत्री नवाब मलीक आणि आदित्य ठाकरेंबाबत बोलाताना ठाकरेंनी सांगितलं की, ज्यांच्यापासून धास्ती वाटत आहे त्यांच्याबद्दलच आरोप करण्यात येत आहेत. सत्ताधाऱ्यांचेही अनेक गैरप्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘एसआयटी’ चौकशीही प्रकरणंही बरीच मोठी आहेत. सत्ताधाऱ्यांना या भानगडीत न पडता आपलं काम करावं अन्यथा आम्ही मुद्दे उचलले तर तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्याही ‘एसआयटी’ चौकशी कराव्या लागतील असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT