Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : खेळाडूंसाठी मोदींनी काय काय केले...; मुख्यमंत्र्यांनी पाढाच वाचला!

Vidarbha Political News : बल्लारपूर येथे केले 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद‌्घाटन

संदीप रायपुरे - Sarkarnama

Ballarpur : गाव तिथे मैदान, खेळाडूंना देण्यात देणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ, क्रीडापटूंना प्रोत्साहन अशा अनेक योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम क्रीडा क्षेत्रासाठी केले ते आजपर्यंत कुणीही केले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची स्तुती केली.

चंद्रपूर येथील बल्लारपूरच्या तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या सुमारे 20 मिनिटांच्या भाषणातील निम्म्यावर वेळेत मुख्यमंत्र्यांनी केवळ मोदींची स्तुती केली. कार्यक्रमस्थळी असलेल्या विशेष ‘स्पोर्ट्स ट्रेन’मधून मान्यवरांचे आगमन झाले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेवर येईपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. अनेक वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनी देशासाठी व क्रीडापटूंसाठी काहीच केले नाही. मात्र आता देत बदलत आहे. मोदी असतील तर प्रत्येकाला न्याय मिळण्याची गॅरंटी आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारही क्रीडा क्षेत्रात बदल करण्यासाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या कार्याचीही शिंदे यांनी स्तुती केली.

कार्यक्रम कोणताही असो सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) त्यांच्या जिल्ह्याचे वैभव वाढविणाऱ्या वाघांची प्रतिमा भेट देतात आणि बनसोडे क्रीडा विभागासाठी जास्तीत जास्त निधी मागत राहतात, असे शिंदे मिश्किलपणे म्हणाले. गमतीचा भाग वगळला तर दोन्ही मंत्री विकासासाठीच निधीची मागणी करता असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वारंवार सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आगामी काळात क्रीडा क्षेत्रात मोठा बदल दिसणार आहे. राज्यात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ होणार आहे. त्यातून खेळाडूंना महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल व खेळाडूंची पिढी निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. यात खेळाडूंना नियमानुसार स्थान देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व्हावी, यासाठी सर्व शासकीय विभागांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाच्या मैदानावर जाऊन आपल्या पदरात काहीच पडणार नाही, असे जर कोणाला वाटत असेल तर हा विचार चुकीचा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मिशन ऑलिम्पिक 2036 हे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवत खेळाडूंनी मार्गक्रमण करावे, असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT