Lokesh Kallu Yadav Gondia. Sarkarnama
विदर्भ

Gondia Shoot Out : यादव गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त; आणखी दोन जेरबंद

अभिजीत घोरमारे

Political Crime : माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू सुंदरलाल यादव (वय 42, रा. यादव चौक) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व आरोपींना साथ देणाऱ्यांचे अटकसत्र गोंदिया शहर पोलिसांनी चालविले आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. या प्रकरणात ज्या माऊझर बंदुकीतून गोळीबार करण्यात आला, ती बंदूक व गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी ‘सरकारनामा’ला दिली आहे.

11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सावलानी किराणा दुकानासमोर हेमू कॉलनी चौकात दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करून माजी नगरसेवक कल्लू यादव यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. या प्रकरणात 12 जानेवारी रोजी चार आरोपींना अटक करण्यात आली. 13 जानेवारीला दोन आरोपींना, 14 जानेवारीला एका आरोपीला तर सोमवारी (ता. 15) आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

आतापर्यंत तपासात आलेल्या दहा आरोपींपैकी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम हा फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दुसरीकडे रोहित मेश्राम व धनराज राऊत या दोघांच्या सांगण्यावरून नागपूरच्या दोन्ही आरोपींजवळील बंदूक तिरोडा तालुक्यातील विहिरगाव येथील परंतु सध्या गोंदियातील कुंभारेनगरात असलेल्या नितेश कोडापे (वय 28) याच्या घरी लपवून ठेवण्यात आली होती.

आरोपी गणेश शर्मा व अक्षय मानकर या दोघांनी गोळीबार करण्यासाठी मोटारसायकलचा क्रमांक MH35-AT 9816 वापर केला. आरोपी रोहित मेश्राम व धनराज राऊत यांच्या सांगण्यावरून शुभम हुमणे व पंछी डोंगरे या दोघांनी मोटारसायकलची व्यवस्था केली होती. गोळीबार केल्यानंतर नागपूरला पळून जाण्यासाठी दुसऱ्या मोटारसायकलचा क्रमांक MH35-Z 0013 वापर करण्यात आला. त्या मोटारसायकलची सोय मयूर रंगारी याने करून दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 12 जानेवारी रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (वय 21, रा. भिडी ले-आउट, वरोडा, जि. नागपूर), अक्षय मधुकर मानकर (वय 28, रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलनी कळमेश्वर, जि. नागपूर), धनराज ऊर्फ रिंकू व राजेंद्र राऊत (वय 32, रा. कुंभारेनगर, गोंदिया). नागसेन बोधी मंतो (वय 41, रा. गौतम बुद्ध वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया), 13 जानेवारी रोजी शुभम विजय हुमणे (वय 27, रा. भीमनगर, गोंदिया), सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (वय 23, रा. कुंभारेनगर, गोंदिया), 14 जानेवारी रोजी रोहित प्रेमलाल मेश्राम (वय 32, रा. कुंभारेनगर, गोंदिया) व 15 जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (वय 28, रा. विहिरगाव, तिरोडा- ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयूर ऊर्फ सानू विजय रंगारी (वय 27, रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया) यांचा समावेश आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT