Nagpur Political News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाल्याचेच दिसून आले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र या दोन्ही गटांतील आमदारांनी एकमेकांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिपदावरून चिमटे, फिरकी, टोल्यांमुळे नागपूर विधिमंडळ आवारात एकच हशा पिकला होता. या वेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यामध्ये मंत्रिपदावरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार विधिमंडळाच्या आवारात एकत्र आले होते. त्यावेळी या आमदारांनी एकमेकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट सत्तेसोबत गेल्यापासून मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. यासाठी त्यांनी काही वेळा नाराजीही व्यक्त केली होती. त्यावरूनच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी (Vaibhav Naik) दोघांनाही चिमटे काढले.
आमदार नाईक, शिरसाट आणि गोगावले माध्यम प्रतिनिधींसमोर एकत्र आले. त्यावेळी वैभव नाईकांनी 'सरकारचे शेवटचे अधिवेशन आले तरीही शिरसाट यांना मंत्रिपद मिळाले नाही. आम्ही विरोधात असलो तरी जुने सहकारी म्हणून आम्हाला ते मंत्री झालेले पाहण्यात आनंद झाला असता,' असा टोला शिरसाटांना लगावला. त्यावर शिरसाटांनी मैत्रीचा दाखला देत तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या आमदार गोगावलेंना नाईकांनी बोलावून घेतले. त्यावेळी 'गोगावले हे आधीच देवदर्शन घेऊन परेशान झाले आहेत, त्यांना आणखी कशाला बोलवता,' म्हणत शिरसाटांनीही गोगावलेंची फिरकी घेतली.
चिमटे, टोले अन् ऑफरही
चर्चेत सहभागी होताच, नाईकांनी गोगावले यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. 'शिरसाटांनी कोट घातला आहे. मात्र, दर अधिवेशनाला वेगवेगळ्या रंगाचे कोट घालून येणारे भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी कोट घालणे सोडून दिले आहे. त्यामुळे तुम्ही मंत्रिपदाची आशा सोडून दिली आहे का ?', असा उपरोधिक सवाल करत गोगावलेंना टोला लगावला.
यावर मंत्रिपदासाठी देवाला साकडे घालणाऱ्या गोगावलेंनी समयसूचकता दाखवत नाईकांनाच 'तू का कोट घातला आहेस'; असा सवाल करत शिंदे गटात यायचे आहे, अशी विचारणा करून थेट मंत्रिपदाची ऑफर दिली.
'अधिवेशन संपताना मी माझा कोट वैभव नाईकांना देतो, जर ते शिंदे गटात येणार असतील तर मी त्यांच्या मंत्रिपदासाठी थांबायला तयार आहे,' असा टोलाही लगावला. मात्र, शिंदे गटात अद्याप मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, तेच आम्हाला ऑफर देत आहेत, अशी टिप्पणी करत नाईकांनी पुन्हा गोगावलेच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. तसेच 'मंत्रिपदाची संधी नाही मिळाली तरी गोगावले यांनी कोट घालावा, ते शेठ दिसतात,' असाही टोला नाईकांनी लगावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाईक म्हणाले, 'गोगावले आणि शिरसाट हे माझे मित्र आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून उठाव केला होता. मात्र, ते त्यांना अद्याप मिळाले नाही, त्याचे मला दु:ख आहे. राष्ट्रवादीच्या प्रवेशाने त्यांचे मंत्रिपद लांबणीवर पडले. आता काँग्रेसही येणार असल्याने मंत्रिपद मिळणार का नाही,' असा सवाल करत आणखी एक टोला लगावला. यावर 'सध्या नार्वेकरांकडे सुनावणी सुरू आहे. त्यात काहींची आमदारकी रद्द होणार आहे. त्यामुळे कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला असेल. पक्षात पुन्हा इनकमिंग होणार असेल, अशी उलट फिरकी शिरसाटांनी घेतली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.