Farmer in Morshi of Amravati. Sarkarnama
विदर्भ

Upper Wardha Project : धक्कादायक ! प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची उपोषण मांडवातच आत्महत्या

Farmer's Protest : अमरावतीत तणाव; सरकारच्या नावे चिठ्ठी लिहित घेतला गळफास

Amar Ghatare

Amravati : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अपर वर्धा धरणग्रस्तांच्या आंदोलनाला आता गंभीर वळण लागले आहे. मोर्शी येथे आंदोलन करणाऱ्यांपैकी एकाने उपोषण मंडपातच गळफास घेत आत्महत्या केली. सरकारविरोधात या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन त्यामुळे उग्र होणार आहे.

प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, नवीन नियमानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्रधारकाला 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून अपर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी मुळशी येथे आंदोलन करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने एका प्रकल्पग्रस्ताने मोर्शी येथील उपोषण मंडपातच गळफास घेतला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे, अशी मागणी आता होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांची शासनाकडून पूर्तता न झाल्याने गेल्या 252 दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे आहेत. अशातच टाकरखेड येथील शेतकरी गोपाल दहीवडे यांनी उपोषण मांडवात कोणीही नसताना गळफास घेतला. आपल्या आत्महत्येला शासन, प्रशासन जबाबदार असल्याचे दहीवडे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. चिठ्ठीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा उल्लेख आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहीवडे यांच्या आत्महत्येनंतर शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. मोर्शीत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दहीवडे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा उठाव आता चिघळण्याची चिन्हे आहेत.

दहीवडे यांचे अखेरचे शब्द

‘माझ्या मरणाला शासन, प्रशासन जबाबदार आहे. परंतु उमेशभाऊ चळवळ बंद करायची नाही. उमेशभाऊ माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेऊ देऊ नये,’ असे दहीवडे यांनी गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांचा संताप आता अनावर झाला आहे. सरकारने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

राजीनाम्याची मागणी

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कोण सरकार चालवत आहे हे कळायला मार्ग नाही. राज्य सांभाळणे होत नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका अ‍ॅड. ठाकूर यांनी केली.

मंत्रालयातून घेतल्या होत्या उड्या

अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी मुंबईच्या मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मंत्रालयातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत हा तिढा सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रात्रभर शिदोरी आणि शेकोट्यांसह ठिय्या दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा मुंबईकडे निघाले होते. त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ रोखले होते. तेव्हापासून पुन्हा हा प्रश्न थंड बस्त्यात पडला. आता प्रकल्पग्रस्ताने ऐन उपोषण मांडवात आत्महत्या केल्याने अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा प्रकल्पाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT