Akole News: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतापाची तीव्र लाट उसळली आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं करत त्यांना अटकेची मागणी केली आहे. याचवेळी आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील भिडेंवर जहरी टीका करतानाच काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारवरही निशाणा साधला आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी संभाजी भिडेंवर ट्विटच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. त्यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. आंबेडकर म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडें(Sambhaji Bhide)विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भिडेंच्या या वक्तव्याप्रकरणी अमरावतीमध्ये भिडे यांच्यासह निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्या इतरही आयोजकांवर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापुरूषांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणे, समाजात तेढ निर्माण करणे, गुन्हे भिडेंवर नोंदवले गेले आहेत. याचवेळी राज्यभरातून त्यांच्याविरोधात काँग्रेस निषेध आंदोलने करत असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
'' कोणाच्याही विरूद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही..''
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील संभाजी भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच आहे. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिलं जातं.अशा महानायकाबाबत अशा प्रकारचं वक्तव्य करणं अनुचित आहे. अशी वक्तव्ये भिडे गुरूजींनीच नाही तर दुसरं कुणीही करू नये.
अशा प्रकाराच्या वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात संतापाची भावना पसरते. महात्मा गांधीविरुद्ध असं बोललेलं लोक कधीही सहन करून घेणार नाहीत. यासंदर्भात राज्य सरकार उचित कारवाई करेल. महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कोणाच्याही विरूद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
'' भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही...''
संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही ते त्यांची स्वतची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काही कारण नाहीये. जसं याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरले, तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी ज्यावेळी बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून, कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असही फडणवीसांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.
त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.