Chandrashekhar Bawankule-Chhagan Bhujbal-Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : भाजपच्या बड्या नेत्याची पवार-भुजबळ भेटीवर प्रतिक्रिया; ‘भुजबळांच्या मनात काय माहिती नाही; पण...’

Rajesh Charpe

Nagpur, 15 July : राज्य सरकारच्या कारभारावर परखड मत व्यक्त करणारे आणि दुसरीकडे विरोधकांनाही अंगावर घेणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात काय आहे, याची आपणांस माहिती नाही. मात्र, ते महायुतीला डॅमेज करणार नाहीत, असा विश्वास भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नाशिक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीतही डावलण्यात आल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाचा विषय ज्या पद्धतीने मुख्यमंत्री हाताळत आहेत, त्यावरही मंत्री भुजबळ नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील जनसन्मान रॅलीत छगन भुजबळ यांनी रविवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली होती. आज ते चक्क पवारांच्याच भेटीला गेले आहेत.

छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारले असता ते म्हणाले, छगन भुजबळ यांच्या मनात काय आहे, हे आपणास सांगता येणार नाही. त्यांची राजकीय वाटचाल आपण जवळून बघितली आहे. ते महायुतीला सोडून जाणार नाही. आमचे मार्गदर्शक म्हणून ते आमच्यासोबत काम करत राहतील.

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सर्वच पक्षाचे नेतेमंडळी भेटत असतात. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तणाव निर्माण झाला आहे. तो निवळावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. भुजबळ या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत याच विषायवर चर्चा करायला गेले असतील. प्रत्येक भेटीत राजकारण हा एकमेव विषय असतोच, असे नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाचा पेच सोडविण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीने त्या बैठकीला येणे टाळले, याचा निषेध चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा केला.

महाविकास आघाडीने मराठा आरक्षण बैठकीवर टाकलेला बहिष्कार निंदनीय आहे. एकीकडे मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावर राजकारण करायचे आणि निर्णय घ्यायच्या बैठकीत जायचे नाही, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. दोन्ही समाजाला महाविकास आघाडीचे राजकारण आता कळले आहे. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जनता बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT