Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते कामाला लागले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती, रामटेकच्या गडाची. महायुतीमधील भाजपच्या उमेदवाराची. वास्तविक पाहता रामटेकची जागा सध्या शिवसेना एकनाथ शिंदे सेनेकडे आहे . कृपाल तुमाने येथे खासदार आहेत. या वेळी भाजप या जागेवर स्वत: लढणार असल्याची चर्चा आहे. रामटेकच्या जागेसाठी भाजपकडे स्वपक्षातील अर्धा डझनवर प्रामाणिक आणि एकनिष्ठ इच्छुकांची फौज आहे. असे असताना विरोधी पक्षातील एका आमदाराला प्रवेश देऊन त्याला रामटेकच्या गडावर चढविण्याचा सुरू असलेला केविलवाणा प्रयत्न तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच खटकत आहे.
2014 पासून कृपाल तुमाने रामटेक लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या ढिम्म कार्यप्रणालीवर या वेळी मतदारांमध्ये संताप आहे. विशेष म्हणजे भाजपने राज्यातील संपूर्ण 48 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे रामटेकसाठी कुठल्याही परिस्थितीत ‘रिस्क’ न घेता स्वपक्षातीलच एक चांगला सर्व परिचित व जनसंपर्कात असलेला चेहरा रामटेकच्या मैदानात उतरविण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. दुसरीकडे ही जागा भाजप लढणार असल्यामुळे तुमाने यांनीसुद्धा प्रसंगी हातातील 'धनुष्य' सोडून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु भाजपकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडे किमान अर्धा डझनवर उमेदवार आहेत. यात माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूरचे नगरसेवक संदीप गवई, धर्मपाल मेश्राम, डॉ. शिरीश मेश्राम, डॉ. प्रतिभा मांडवकर यांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय व प्रदेश भाजपकडून तीन वेळा सर्वेक्षण झाल्याचे समजते. यात उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे व अरविंद गजभिये ही दोन नावे दिल्ली दरबारी पोहोचली आहेत. अरविंद गजभिये हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्या रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. याशिवाय ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. पक्ष संघटनेत काम करताना त्यांनी सामान्य नागरिकांत मिसळण्यास प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गजभिये यांच्या नावाला स्वीकृती दर्शविली तरी सामान्य नागरिकांना ते पचनी पडेल का? यावरसुद्धा पक्ष पदाधिकारी चिंता आणि चिंतन करीत आहेत.
संदीप गवई यांच्या नावाचा विचार झाल्यास ‘नागपूर पार्सल’ म्हणून मतदारांत वेगळा ‘मॅसेज’ जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी गवई यांना उमरेड विधानसभा व भंडारा विधान परिषदेच्या निवडणुकीत हिसका दाखविला गेला. धर्मपाल मेश्राम आणि गवई यांचा ग्रामीण भागाशी संबंध नाही. हे विशेष. डॉ. शिरीष मेश्राम हेसुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुधीर पारवे यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र, पराभवानंतर डॉ. मेश्राम हे भाजपवासी झालेत. डॉ. प्रतिभा मांडवकर सध्या ‘बॅकफूट’वर आहेत. या सहा चेहऱ्यांपैकी माजी आमदार सुधीर पारवे आणि माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचे नाव आघाडीवर असून, त्यावर दिल्ली दरबारात खलबते सुरू आहेत. अशातच आता काँग्रेसमधील एका आमदाराची ‘एन्ट्री’ भाजप कार्यकर्त्यांना चांगलीच खूपत आहे. स्वपक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत चेहरे सोडून तिसऱ्याच व्यक्तीचा विचार झाल्यास सामान्य कार्यकर्ते खरेच तेवढ्या ताकदीने काम करतील का? हा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे उभा असल्याने या ‘एन्ट्री’वर विचारमंथन सुरू आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख अरविंद गजभिये यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. त्यांना उमेदवारी देऊन भाजप देशभरात चांगला ‘मॅसेज’ देऊ शकते. रामटेक आणि उमरेड आरक्षित असताना भाजपकडून केवळ विशिष्ट प्रवर्गाला स्थान मिळत आहे. दलितांचा पाठीराखा म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसलाही त्याचा संसर्ग झाला आहे? त्यामुळे या वेळी गजभियेंचादेखील विचार होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव्ह बँक व पंजाबराव देशमुख क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचे गजभिये हे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. सोबतच भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते बघतात.
माजी आमदार सुधीर पारवे यांनी सलग दोन टर्म उमरेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2019 मधील निवडणुकीत पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले. या जातीय समीकरणाचा थेट फटका उमरेडमध्ये भाजपला बसला. केवळ 15 हजार मतांनी सुधीर पारवे पराभूत झालेत. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, पंचायत राज समिती प्रमुख असा त्यांचा प्रवास आहे. विकासाची दृष्टी, सामान्य राहणीमान, उत्तम जनसंपर्क आणि गोड भाषाशैली ही त्यांची जमेची बाजू आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची सासरवाडी ही सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वर येथील ‘पहेलवान’ कुटुंबातील आहे. त्यामुळे केदारांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी हे सावनेरचे ‘जावई बापू’ भाजपसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
रामटेक लोकसभेची जागा काँग्रेस लढणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यासाठी आमदार राजू पारवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय मेश्राम यांची नावे चर्चेत आहेत. रश्मी बर्वे यांच्या नावाला पक्षातून पसंती असल्याचे संकेत आहेत. बर्वे या केदार गटातील असल्यामुळे उपराजधानीतील काही नेते त्यांच्या नावाला खासगीत विरोध करताना दिसतात. कुणाल राऊत यांच्या नावाला युवकांकडून प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामिण भागात त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. केवळ माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा ही ओळख रामटेकसाठी पुरेशी आहे का? असा सवाल काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून विचारला जात आहे. किशोर गजभिये यापूर्वी निवडणूक लढले मात्र त्यांना यश मिळाले नाही. या वेळी गटबाजी विसरून काँग्रेस संघटितपणे गजभिये यांच्या बाजूने राहिल्यास रामटेकच्या गडावर चित्र बदलायला वेळ लागणार नाही, असाही सूर व्यक्त होत आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या 10 वर्षांतील ‘बॅकलाग’चा संताप गजभियेंसाठी फायद्याचा ठरू शकतो. उमरेडचे आमदार राजू पारवे यांनादेखील काँग्रेस हिंदू-दलित चेहरा म्हणून रामटेकच्या मैदानात उतरवू शकतात. मात्र, त्यांच्याबाबतीत पक्ष जपून निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.
काँग्रेसचा एक विद्यमान आमदारही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यांचा विचार होत नसल्यामुळे ते लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये ‘एन्ट्री’ मारण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सुरू असलेले त्यांचे नियमित कोराडीदर्शन सर्वश्रुत आहे. त्यांना कोराडीत दर्शनासाठी ‘एन्ट्री’ असली तरी भाजपमध्ये लोकसभेसाठी ‘नो एन्ट्री’ असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. भाजपकडे स्वपक्षात अर्धा डझन एकनिष्ठ चेहरे असताना भाजप ‘हायकमांड’ दुसऱ्या पक्षातील ‘इमेज डाउन’ ओझे मानगुटीवर बसवून स्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी कशाला ओढवून घेणार असा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस रामटेकची जागा लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे असताना आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्ध एक ठराव घेत, माजी आमदार प्रकाश गजभिये यांना रामटेकच्या गढावर चढविण्याचा निर्णय घेतला आहे. गजभिये हे चळवळीतले नेते असून, ते लोकसभेच्या मैदानात उतरल्यास सामना अधिकच रंगणार आहे.
रामटेकची जागा काँग्रेस लढणार असल्याचे सध्या सर्वश्रुत असले तरी मध्यंतरीचा सहा सात महिन्यांतील कालखंड बघता शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपराजधानीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या विषयाने आयोजित सभेत मुख्य वक्ता म्हणून हजेरी लावली आहे. शिवसेना ठाकरे नेत्या ते वक्त्या म्हणून त्यांची ही ‘एन्ट्री’ अनेकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. त्यामुळे अंधारेंच्या सभा कुठे आणि कसा प्रकाश पाडणार, हासुद्धा प्रश्नच आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.